जंक्शनच्या एमआयडीमुळे 
इंदापूरच्या विकासाला मिळणार गती

जंक्शनच्या एमआयडीमुळे इंदापूरच्या विकासाला मिळणार गती

Published on

जंक्शनच्या एमआयडीमुळे
इंदापूरच्या विकासाला मिळणार गती

इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथे नव्याने एमआयडीसी मंजूर झाली आहे. जंक्शनच्या ‘एमआयडीसी’मुळे इंदापूर तालुक्यातील उद्योजकांना चालना मिळणार आहे. नवउद्योजकांना नव्याने उद्योगधंदे सुरु करण्यासाठी संधी मिळणार आहे. तसेच, हजारो नागरिकांना नव्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. जंक्शनची एमआयडीसी इंदापूर तालुक्याच्या विकासाचा मैलाचा दगड ठरेल.

- राजकुमार थोरात, वालचंदनगर

इंदापूर तालुक्याची कृषिप्रधान तालुका अशी राज्यामध्ये ओळख आहे. तालुक्यातील बोरीची द्राक्षे जगामध्ये प्रसिद्ध आहेत. तालुक्याला नीरा- भीमा नद्यांचा, तसेच उजनी धरणाच्या पाणलोटक्षेत्राचा भव्य किनारा लाभला आहे. उजनी धरणाचे पाणलोट क्षेत्र राज्यातील पर्यटकांना आकर्षित करीत आहे. तालुक्यामध्ये लोणीमध्ये पंचतारांकित एमआयडीसी असून, अनेक कंपन्या कार्यरत आहेत. तसेच, भिगवणजवळ बिल्ट ग्राफीक्स ही कागद निर्मिती करणारी कंपनी आहे. वालचंदनगर येथील वालचंदनगर इंडस्ट्रीज ही कंपनी इंदापूरचे नाव जगाच्या नकाशावर चमकवत आहे. तालुक्यामध्ये सोनाई उद्योग समूहाने व नेचर उद्योग समूहाने राज्यामध्ये डेअरी व्यवसायामध्ये राज्यात नाव चमकवले आहे. तालुक्याच्या सर्वांगिण विकास होत असून औद्योगिक विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्नशिल आहेत.

जंक्शनकरांच्या मागणीला यश
इंदापूर तालुक्यामध्ये जंक्शन हे बारामती- इंदापूर रस्त्यालगत गाव असून, ते तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून परिचित आहे. जंक्शनमध्ये १००पेक्षा अधिक लहुउद्योजक असून, लघुउद्योजकांचे स्वत:च्या जागेमध्ये वर्कशाॉप आहेत. या वर्कशॉपमध्ये वालचंदनगर कंपनीसह साखर कारखाने, सिमेंट कारखाने, पॉवरप्लंटचे सुट्टे भाग तयार करण्यात येत आहेत. तसेच मेट्रो रेल्वेसाठी लागणारे महत्त्वाचे सुट्टे भाग सुरू करून देशातील, तसेच परदेशातील कंपन्यांना सुट्टे भाग पाठविण्यात येतात. लघू उद्योजकांना उद्योगासाठी जागा अपुरी पडत होती. तसेच, इतर सुविधा मिळत नव्हत्या. सन १९८५पासून जंक्शनमध्ये मिनी एमआयडीसी सुरु करण्याची मागणी उद्योजक करीत होते. कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी लघू उद्योजकांची मागणी सरकारकडे मांडून नव्याने एमआयडीसी मंजूर करून घेतली.

१५०० एकराची मागणी
जंक्शनच्या एमआयडीसी महाराष्ट्र राज्य शेतीमहामंडळाच्या ताब्यातील १३१ हेक्टर ५० आर. जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला हस्तांतर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये वाढ करण्याची मागणी कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सरकारकडे केली आहे. १५०० एकर जमीन एमआयडीसीसाठी मिळावी, अशी जंक्शन परिसरातील उद्योजकांची मागणी आहे.

पश्‍चिम भागाचा होणार विकास
जंक्शनच्या एमआयडीसीमुळे इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागाचा विकास होणार आहे. पश्‍चिम गावातील जंक्शन, लासुर्णे, अंथुर्णे, सणसर, वालचंदनगर, कळंब, कळस, बेलवाडी, भवानीनगर या गावांना महत्त्व प्राप्त होणार असून, विकासाच्या नवीन संधी तयार होणार आहेत. तसेच, संत तुकाराम महाराज पालखी महामार्गामुळे विकासामध्ये भर पडणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विकासाच्या दृष्टीमुळे इंदापूरच्या विकासाला गती मिळणार आहे. जंक्शनामधील लघुउद्योजक गेल्या ४० ते ४५ वर्षांपासून या परिसराला मिनी एमआयडीसी दर्जा मिळावा प्रयत्नशील होते. मात्र, यश मिळत नव्हते. आमदार दत्तात्रेय भरणे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योजकांचा जंक्शनच्या एमआयडीसीचा प्रश्‍न पाठपुरावा करून मार्गी लावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com