‘छत्रपती’कडून शेतकऱ्यांना १४५ कोटी रुपये
वालचंदनगर, ता. २२ : ‘‘भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने आतापर्यंत १४४ कोटी ७२ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. छत्रपती कारखान्याचा वजन काटा चोख आहे. पैसे ही रोख आहेत. शेतकऱ्यांनी बिनधोखपणे छत्रपती कारखान्याला ऊस द्या,’’ असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी केले.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामामध्ये ‘वजन चोख अन् पैसे रोख’ ही संकल्पना वापरून शेतकऱ्यांना उसाचा पहिला हप्ता वेळेमध्ये देण्याचा प्रयत्न केला. अनेक वेळा वेळेपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले आहेत. कारखान्याचा गळीत हंगाम १ नोव्हेंबर रोजी सुरु झाला असून, ८२ दिवसांमध्ये ६ लाख २२ हजार २३४ टन ऊस गाळप केला असून, ६ लाख ८३ हजार क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. साखरेचा उतारा ११.१५ टक्के झाला असून, बुधवारी (ता. २१) साखरेचा उतारा ११.९१ टक्के मिळाला.
कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून ३ कोटी ७ लाख ८७ हजार ५०० युनिटची वीजनिर्मिती केली असून, यातील २ कोटी २ लाख ४९ हजार युनिट वीज निर्यात केली आहे. कारखान्याची दररोज उस गाळप करण्याची गाळप क्षमता ६५०० टन आहे. मात्र कारखाना सरासरी दररोज ८ हजारापेक्षा अधिक उसाचे गाळप करीत आहे. कारखान्याचे संचालक मंडळ रात्रंदिवस कामकाजावर लक्ष ठेवून आहे. शेतकऱ्यांची गैरसोय होवू नये म्हणून १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान गाळप केलेल्या उसाचे पैसे ४०.६० कोटी रुपये कारखान्याच्या संचालक मंडळाने सलग बॅंकेच्या सुट्ट्यांमुळे तीन दिवस अदोगर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. तसेच, आतापर्यंत कारखान्याने १४४.७२ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले असून, शेतकऱ्यांना वेळेमध्ये पैसे देण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न आहे.
१२ लाख टन ऊस गाळणार
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यासाठी चालू वर्षीचा गळीत हंगाम महत्त्वाचा आहे. १२ लाख टन ऊस गाळपासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना १६ जानेवारीपासून गाळप झालेल्या उसाचा ३२०१ रुपये प्रतिटन उसाचा पहिला हप्ता मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

