छत्रपती कारखान्याची उत्पादकता वाढीसाठी झेप

छत्रपती कारखान्याची उत्पादकता वाढीसाठी झेप
Published on

वालचंदनगर, ता. १२ : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने मार्च व एप्रिल २०२६ मध्ये को-८६०३२ व एम.एस.१०००१ या दोन ऊस जातीच्या रोपांची लागवड करणाऱ्या सभासदांना सन २०२६-२७ च्या गळीत हंगामामध्ये शंभर रुपये प्रतिटन अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी दिली.

सन २०२६-२७ च्या गळीत हंगामामध्ये उसाची उपलब्धता वाढविण्यासाठी छत्रपतीच्या संचालक मंडळाने आतापासून प्रयत्न सुरू केले आहेत. १० मार्च ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीमध्ये को-८६०३२ व एम.एस.१०००१ या दोन ऊस जातीच्या पाच फूट सरी पद्धतीने ऊस रोपांची लागवडीसाठी कारखान्याने परवानगी दिली आहे. मार्च व एप्रिल या महिन्यामध्ये ऊस लागवडीसाठी इच्छुक असणाऱ्या सभासदांना ऊस रोपांची ५० टक्के रक्कम कारखान्याकडे जमा करावयाची असून उर्वरित ५० टक्के रक्कम कारखाना भरणार आहे. पुढील वर्षीच्या गळीत हंगामामध्ये ऊस तुटून गेल्यानंतर ऊस बिलातून सदरची रक्कम कपात करण्यात येणार आहे. तसेच या कालावधीमध्ये लागवड केलेल्या उसास प्रतिटन १०० रुपये अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. रोपांची लागवड केलेला ऊस सभासदांनी छत्रपती कारखान्याला गाळपासाठी देणे बंधनकारक केले आहे. ज्या सभासदांना ऊस रोपे खरेदी करावयाची असतील त्यांनी कारखान्याचे ऊस विकास विभागाकडे संपर्क साधण्याचे आवाहन कारखान्याच्या संचालक मंडळाने केले आहे.

जास्त उत्पादन घेणाऱ्या बक्षीस
सन २०२६-२७ च्या गळीत हंगामामध्ये ऊस रोप लागवडीमधून जास्त उत्पादन घेणाऱ्या पहिल्या तीन सभासदांना छत्रपती कारखाना बक्षीस देणार असून कारखान्याच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी दिली.

दहा वर्षातील उच्चांकी उतारा
सन २०२५-२६ च्या गळीत हंगामामध्ये श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या योग्य नियोजनामुळे कारखान्याच्या उताऱ्यात विक्रमी वाढ झाली. ११.३६ टक्के उसाची उतारा मिळाली आहे. दहा वर्षातील उच्चांकी उतारा असून यामुळे सभासदांना अधिकचा ऊस दर मिळण्यास मोलाची मदत होणार आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com