
वाल्हे पाणी योजनेचा वीज पुरवठा बंद
वाल्हे, ता. १४ : पुरंदर तालुक्यातील वाल्हे व आडाचीवाडी या गावांना नळाने पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत मोटारींचे वीजबिल ग्रामपंचायतीने वेळच्या वेळी न भरल्यामुळे ‘महावितरण’ने या पाणीपुरवठा योजनांचा विद्युत पुरवठा बंद केला आहे.
‘महावितरण’ने थकीत वीजबिल न भरणाऱ्यांच्या विरोधात मोहीम उघडली असून, ‘महावितरण’ने आक्रमक भूमिका घेत सरसकट वीजतोड मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत ‘महावितरण’ने शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी आणि ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनींची वीजतोडणी सुरू केली आहे.
वाल्हे येथील महावितरणचे सहायक अभियंता श्रीकांत बोधले म्हणाले, ‘‘ग्रामपंचायतींना वेळोवेळी नोटीस पाठवूनदेखील त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शेवटी वरिष्ठांच्या आदेशानुसार वाल्ह्यासह आडाचीवाडी ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या वीज मोटारींचे वीजजोड बंद केले आहेत. तर, वागदरवाडी व सुकलवाडी ग्रामपंचायतीने एक दिवसाची मुदत मागितली असून, त्यांनी थकीत वीजबिलाचा भरणा न केल्यास त्यांचेदेखील वीजकनेक्शन कट केले जाणार आहे. वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे.’’
दरम्यान, वाल्ह्याचे सरपंच अमोल खवले यांनी विद्युत मोटारीच्या थकबाकीसोबतच गावची घरपट्टी व पाणीपट्टी भरून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.