वाल्हे : रामायणकार महर्षी वाल्मिकींची तपोभूमी
पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील वाल्मिकऋषींच्या समाधीस्थळास मोठे महत्त्व आहे. त्यांनी हिंदू धर्मातील पवित्र महाकाव्य मानल्या जाणाऱ्या रामायणाचे लिखाण केल्यानंतर पुढील अनेक वर्षांनी त्यांच्या लिखाणानुसार रामायण घडले. त्यामुळे महर्षी वाल्मिकींच्या या तपोभुमीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
- किशोर कुदळे, वाल्हे
महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरी गडापासून बारा किलोमीटर अंतरावर असलेले वाल्हे गाव हे अति प्राचीन गावांपैकी एक मानले जाते. अशा या वाल्हे गावाला धार्मिकरित्या अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण वाल्मिऋषींनी एक तप राम नामाचा जप केल्यानंतर रामायण हा ग्रंथ लिहिला, अशी आख्यायिका आहे. महर्षी वाल्मिकींच्या जन्माबाबत अनेक पौराणिक कथा ऐकावयास मिळतात. त्रेता युगात वाल्मिकीऋषींचा जन्म झाल्याचे मानले जाते. जवळजवळ द्वापारी युगातील दानशूर वीर कर्ण याच्या जन्माशी साधर्म्य असलेली घटना वाल्मिकीऋषींच्या जन्माबाबत सांगितली जाते.
वाल्मीकी हा त्यांच्या आईला सूर्याच्या कृपेने झालेला मुलगा होता व त्यामुळे त्याच्या आईने त्यास नदीत सोडून दिले होते. ते बालक प्रवाहासोबत वाहत जाऊन एका कोळ्याला सापडले होते. त्या कोळ्यांनीच या बालकाचे नाव वाल्मीकी असे ठेवले होते, असे सांगतात. उदरनिर्वाहासाठी तो करत असलेल्या वाटमाऱ्यामुळे दरोडेखोर वाल्ह्या कोळी म्हणून कुप्रसिद्ध होता.
वाल्हे गावच्या परिसरात कोळविहिरे ते वाल्हे या परिसरात त्याचा वावर असल्याचेही बोलले जाते. कारण, लूटमार केल्यानंतर तो ज्या रांजणांमध्ये खडा टाकायचा, तो सात रांजण डोंगर वाल्हे गावाच्या पूर्वेला साधारणत: एक ते दोन किलोमीटर अंतराच्या डोंगरावर असून, त्या डोंगरावरील सात रांजणांचे प्रतीक मानल्या गेलेल्या दगडीपैकी चार ते पाच अजूनही दिसतात. बाकीचे काळाच्या ओघात कोसळले आहेत.
वाल्मिकी ऋषींच्या या सात रांजण डोंगराप्रमाणेच वाल्हे कोळ्याचा विहिरीचे देखील आख्यायिका सांगितली जाते. जंगलात फिरत असताना वाल्या कोळी ज्या ठिकाणी पाणी पिण्यास जायचा, ती विहीर कोळविहिरे गावच्या हद्दीत होती. वाल्ह्या कोळ्याच्या विहिरीच्या नावावरूनच गावाला कोळविहिरे; तर वाल्हे येथे त्यांनी समाधी घेतल्यामुळे वाल्हे गावाचा समाधीचे गाव म्हणून सुरवातीला वाला, नंतर वाल्हा व आता वाल्हे म्हणून गाव ओळखले जाते.
अशा या क्रूर व मदांध वाल्ह्या कोळ्यास पुढे नारदांनी उपदेश दिला व रामायण लिहिण्यास सांगितले. नारदांच्या उपदेशानंतर त्याने पश्चात्ताप करत आपला हातातील कुऱ्हाड तिथेच जमिनीवर रोवून सलग बारा वर्षे तपचर्या केली. पुढे या वाल्ह्याचाच वाल्मीकी व महर्षी वाल्मिकीऋषी झाल्याची आख्यायिका आहे. पुढे त्यांनी सात कांड रामायण हा ग्रंथ लिहिला व त्यानंतर कित्येक वर्षांनी प्रभू श्रीरामचंद्र जन्मास आले व महर्षी वाल्मिकींनी वर्णन केल्याप्रमाणे रामायण घडले.
आदिवासी समाजाचे दैवत
महाराष्ट्रातील आदिवासी महादेव कोळी समाज हे महर्षी वाल्मिकींना आपले दैवत मानतात आणि या श्रद्धेपोटीच गेल्या काही वर्षांपासून राज्यभरातील महादेव आदिवासी कोळी समाज हा महर्षी वाल्मिकींच्या जयंतीला वाल्मिकनगरीमध्ये दर्शनासाठी मोठ्या संख्येने जमत असतो. या समाजाला वाल्मिकींच्याचरणी एकत्र आणण्याचे काम महाराष्ट्र कोळी समाज संघाच्या माध्यमातून दिवंगत शिवसेना नेते अनंत तरे यांनी केले. नजीकच्या काळामध्ये मागील काही वर्षांपूर्वी वाल्मिकीऋषी समाधीस्थळाला तीर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा प्राप्त झाला असून, या समाधीस्थळाचे स्मारकात रूपांतर व्हावे, अशी वाल्हेकर ग्रामस्थांसोबतच समस्त महादेव कोळी समाजाची मागणी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.