

वाल्हे, ता. २१ : आडाचीवाडी (ता. पुरंदर) येथील रहिवासी व रायगडचे उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली आडाचीवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने चाळीस गुंठ्यांमध्ये उभारलेल्या नाना-नानी पार्कमध्ये उन्हाळी सुट्ट्यांमुळे चिमुकल्यांसह पालकांची गर्दी होत आहे. हिरवळीचा गारवा तसेच पार्कमधील घसरगुंडी, सीसॉ, झोके आदी करमणुकीच्या साधनांमुळे संध्याकाळच्या वेळेस गावासह परगावाहून येथे येणाऱ्या नागरिकांसाठी हक्काचे उद्यान झाले असून दररोज संध्याकाळी हे उद्यान गजबजून जात आहे.
गाव शहरांमधील वाढत्या लोकवसाहती व कॉंक्रीटचे जंगल वाढू लागले आहे. त्यामुळे झाडांची कत्तल होऊन मुलांना व वयोवृद्धांना खेळण्यासाठी किंवा निवांत बसण्यासाठीची हक्काची ठिकाणे गायब होऊ लागली आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन शहरी भागांप्रमाणे ग्रामीण भागामधील लहान मुलांसह ज्येष्ठांच्या विरंगुळ्यासाठी आडाचीवाडी (ता. पुरंदर) येथे सर्व सोईसुविधांनीयुक्त नाना-नानी पार्क विकसित केले आहे. या पार्कमध्ये हिरवळीचा गालिचा, लहान मुलांसाठी घसरगुंडी, झोके, सीसॉ, कारंजे, डेरेदार झाडे, ज्येष्ठांसाठी आकर्षक बैठकीसाठी बाकांचे कट्टे, कडक उन्हातही अल्हाददायक सावलीसाठी उभारलेले आकर्षक शेड लक्ष वेधून घेत आहे. या पार्कमुळे गावासह परिसरातील वैभवात भर पडल्याचे दिसून येत आहे. ‘‘विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केल्यास विकास साध्य होऊ शकतो. भविष्यातही अशाच पद्धतीने सर्वांचे सहकार्य राहिल्यास परिसरात विविध योजना राबविणार,’’ अशी ग्वाही आडाचीवाडीचे रहिवासी व रायगडचे उपजिल्हाधिकारी शिर्के यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.