पिंगोरीत बिबट्याची पुन्हा दहशत

पिंगोरीत बिबट्याची पुन्हा दहशत

Published on

वाल्हे, ता. १ : पिंगोरी (ता. पुरंदर) परिसरात शनिवारी (ता. २९) सायंकाळी बेलजाईवस्ती येथील वाघदऱ्यामध्ये बिबट्या पुन्हा अवतरला होता. दरम्यान बिबट्याचे दर्शन घडताच परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. येथील शेतकरी मारुती गुलाब शिंदे यांच्या डोळ्यांसमोर शनिवारी (ता. २९) सायंकाळच्या सुमारास बिबट्याने शेळीवर झडप घालून तो झाडीमध्ये पळाल्याची घटना घडली.
पिंगोरी हद्दीतील वाघदरा परिसरामधील माळरानावर शिंदे हे नेहमीप्रमाणे आपल्या जनावरांसह शेळ्या चरावयास सोडून दगडावर बसले असताना त्यांना शेजारी चरत असलेल्या शेळ्यांसह जनावरांचा ओरडण्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने पाहिले असता समोर बिबट्या शेळीवर हल्ला करत असल्याचे दिसताच वयोवृद्ध शेतकरी शिंदे यांनी भयभीत होऊन आराडाओरडा केल्याने बिबट्याने शेळीसह झाडीमध्ये धूम ठोकली.
शिंदे यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकल्यानंतर शेजारील शेतकरी मदतीसाठी धावून आला. त्यानंतर सर्वांनी पुढे जाऊन परिसराची पाहणी केली असता काही अंतरावर बिबट्याने शेळीचा पाठीमागील भाग खाऊन टाकल्याचे निदर्शनास आले. शिंदे यांनी घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर सायंकाळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केल्याचे शिंदे यांनी दै. सकाळशी बोलताना सांगितले.
‘‘बिबट्याचे वारंवार हल्ले होऊ लागल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या शेतकऱ्याला भरपाई मिळवून देण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे,’’ अशी मागणी सरपंच संदीप यादव यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.