माकडांच्या झुंडींमुळे शेतकरी त्रस्त
वाल्हे, ता.१३ : कर्नलवाडी (ता.पुरंदर) येथे गावभर धुमाळू घालणाऱ्या माकडांच्या झुंडींमुळे नागरिकांचा जीव मेटाकुटीस आला आहे. शेतकऱ्यांसह महिलावर्ग सर्वाधिक त्रस्त झाला आहे. माकडांचे कळप शेतातील भुईमूग, डाळिंब, मिरची, चवळीच्या शेंगा, फळबागेचे नुकसान करीत आहेत. यामुळे शेतकरी धास्तावला आहे.
माकडांच्या कळपांमुळे भितीचे वातावरण पसरले आहे. माकडांच्या झुंडी घरांवरील उड्या मारत असल्याने कौलारू तसेच सिमेंटच्या पत्र्यांच्या घरांची मोठी नासधूस करीत असल्याने वनविभागाने या माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
कर्नलवाडी परिसरामध्ये गेले अनेक दिवसांपासून माकडांनी आपला मोर्चा शेतांमध्ये वळविला आहे. पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी माकडांना शेतातून पिटाळून लावतात. परिणामी माकडांनी आपला मोर्चा गावाकडे वळविला आहे. यामुळे गावात माकडांचा उच्छाद वाढल्याचे दिसून येत आहे.
शेतशिवारालगत माकडांचा धुमाकूळ सुरू असून या घरावरून त्या घरावर माकडांच्या झुंडी उड्या मारत असल्याने बहुतांश घरांचे कौले फुटून त्याचप्रमाणे सिमेंटचे पत्रे फुटतात. विजेच्या तारा, गच्चीत ठेवलेले साहित्य, पाण्याच्या टाक्या, झाडांच्या कुंड्या, घरावरील सोलरचे पाइप आदींचे अतोनात नुकसान करत
आहेत. ३०-४० माकडांच्या या कळपाने नागरिक त्रस्त झाले आहेत. माकडांच्या झुंडी असल्याने आवाज केला तरी ती घाबरत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.या माकडांच्या बंदोबस्ताची मागणी पृथ्वीराज निगडे यांनी केली आहे.
माकडे रात्रीच्या वेळी काही घरांच्या छतावर मुक्काम करीत असल्याने छतावर जाणे अथवा फिरणेही धोकादायक झाले आहे. या माकडांच्या वनविभागाकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या मात्र कुणीही या तक्रारींची दखल घेत बंदोबस्त करायला तयार नाहीत. या माकडांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला असता ते चवताळतात. त्यामुळे शेतकऱ्यांसह महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने या
माकडांना पकडून जंगलात सोडणे गरजेचे असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.
याबाबत सासवड वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कर्नलवाडीत कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करणार आहेत.
04885