वाल्हे परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

वाल्हे परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

Published on

वाल्हे, ता.१ : वाल्हे (ता.पुरंदर) परिसरामध्ये गुरुवारी (ता. ३१) रात्री मधलामळा येथील गोठ्यात घुसून बिबट्याने एका वासराचा
फडशा पाडला. यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याने धुमाकूळ घातल्याने वनविभागाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वाल्हे हद्दीतील मधलामळा येथील शेतकरी तुषार बाबूराव भुजबळ हे शुक्रवार (ता. १) सकाळी घराशेजारील गोठ्यामध्ये गेले असता बिबट्याचा हल्ल्याचा प्रकार उघडकीस आला. बिबट्याने हल्ला केल्याने जखमी झालेले वासरू रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. याबाबत भुजबळ यांनी माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. तद्नंतर वनविभागाचे वनरक्षक अशोक फडतरे, वनमजूर हनुमंत पवार, किरण पवार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ दखल घेऊन घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला.
वाल्हे पंचक्रोशीतील पिंगोरी, हरणी, आडाचीवाडी, मांडकी परिसरात बिबट्याच्या वावरामुळे परिसरात शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये भितीचे वातावरण पसरले
आहे. वनविभागाने तत्काळ बिबट्याला जेरबंद करावे. तसेच संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच अतुल गायकवाड यांनी केली आहे.
आडाचीवाडी व वाल्हे परिसरात बिबट्या मुक्त संचार करता असून, वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे मत आडाचीवाडीच्या सरपंच सुवर्णा पवार यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, वनपाल दीपाली शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, सासवड वनपरिक्षेत्र अधिकारी
सागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com