पिंगोरीत भारतीय उलूक उत्सवाचे आयोजन

पिंगोरीत भारतीय उलूक उत्सवाचे आयोजन

Published on

वाल्हे, ता. ३० : इला फाउंडेशनतर्फे पिंगोरी (ता. पुरंदर) येथील इला हॅबिटॅट परिसरात ४, ५ आणि ६ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येणारा भारतीय उलूक उत्सव २०२५ निसर्गप्रेमींसाठी आगळावेगळा अनुभव ठरणार आहे. घुबडांविषयी वैज्ञानिक माहिती, त्यांचे पर्यावरणीय योगदान, सहअस्तित्व आणि अंधश्रद्धा निर्मूलन या उद्देशाने हा उत्सव आयोजित केला असून, राज्यभरातील निसर्गप्रेमींत उत्सुकता वाढली आहे.
या उत्सवासाठी पिंगोरी गावात दोन आकर्षक कमानी उभारण्यात येत असून, इला हॅबिटॅटच्या मुख्य प्रवेशद्वारी ३० फूट लांबीचा भव्य बोगदा (टनेल) तयार करण्यात येत आहे. यामध्ये विविध घुबड प्रजातींचे आकर्षक कटआउट्स लावले जाणार आहेत. यावर्षीचे विशेष आकर्षण असलेल्या पाच फूट उंच शृंगी घुबडाच्या कलात्मक प्रतिकृतीचे रविवारी (ता. ३०) सासवड येथील पुरंदर कलामंचमध्ये विद्यार्थी व कला शिक्षक यांच्या हस्ते अनावरण केले.
घरोघरी योग्य माहिती पोहचावी, मुलांमध्ये घुबडांविषयी प्रेम आणि जागरूकता निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील मूलभूत हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान घुबड हे शेतकऱ्यांचे खरे मित्र असून, पिकांचे नुकसान करणाऱ्या उंदरांवर नैसर्गिक नियंत्रण ठेवतात, याबाबतही माहिती दिली जाणार आहे.
उत्सव काळात मंचावर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार असून, वासुदेव, पिंगळा, गोंधळ या पारंपरिक लोककलेतून, तसेच विद्यार्थ्यांच्या गीत, गायन, नृत्य, वादन या सादरीकरणातून घुबड संवर्धनाबाबत जनजागृती केली जाणार आहे, अशी माहिती इला हॅबिटॅटचे मुख्य राहुल लोणकर, उत्सव नियोजन समितीचे सचिन शिंदे, माऊली खोमणे, राजकुमार पवार यांनी दिली. या उत्सवाच्या आयोजनासाठी इला फाउंडेशन आणि टाटा मोटर्स कमर्शिअल व्हेइकल यांचे संयुक्त सहकार्य असून, पुणे जिल्हा बँकेचे विशेष सहकार्य लाभले आहे.
या भारतीय उलुक महोत्सवात परिसरातील नागरिक, शाळा, महाविद्यालये आणि निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्सव यशस्वी करतील, असा विश्वास डॉ. सुरुची पांडे यांनी व्यक्त केला.

हे उपक्रम ठरणार आकर्षण
घुबडांच्या शास्त्रीय, पर्यावरणीय आणि सांस्कृतिक वारशावर आधारित भव्य प्रदर्शन.
विद्यार्थी आणि नागरिकांसाठी चित्रकला, पोस्टर, रांगोळी, मेहंदी, नाटिका, नृत्य, वक्तृत्व व कथाकथन स्पर्धा.
घुबड थीमवरील दागिने, कलाकृती, पोस्टल स्टॅम्प, छायाचित्रांचे प्रदर्शन.
घुबड व निसर्ग विषयक लघुपट, माहितीपट व पुस्तके सादरीकरण.

भारतात आढळणाऱ्या ४२ घुबड प्रजातींबाबत सर्वसमावेशक माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे हे उत्सवाचे प्रमुख ध्येय आहे. वर्ष २०१९मध्ये झालेल्या पहिल्या उलूक उत्सवाला १९ देशांतील संशोधकांचा सहभाग लाभला होता. यंदाचा उत्सवही त्याच परंपरेला नवी उंची देणार आहे.
-डॉ. सतीश पांडे, संस्थापक, इला फाउंडेशन

05841

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com