महिला शेतकऱ्यासमोरच बिबट्याचा हल्ला
वाल्हे, ता. २९ : पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील वरचामळा परिसरात प्रथमच बिबट्याचा वावर आढळून आल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. रविवारी (ता. २८) रात्री बिबट्याने थेट गोठ्यात दबा धरत महिला शेतकऱ्यासमोरच वासरावर हल्ला करून त्याचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडली. अवघ्या काही फुटांवर घडलेला हा थरार सारिका राहुल भुजबळ या महिला शेतकऱ्यासाठी जीवघेणा ठरू शकला असता.
राहुल भुजबळ व त्यांची पत्नी सारिका भुजबळ हे शेतकरी दांपत्य रविवारी रात्री नेहमीप्रमाणे आपल्या शेतातील गोठ्यात जनावरांची देखभाल करत होते. रात्री साडेनऊच्या सुमारास जनावरांची धारा आटोपून दूध डेअरीत घालण्यासाठी ते वस्तीच्या दिशेने गेले होते. त्यानंतर गोठ्यात चारा टाकत असताना अंधाराचा फायदा घेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक वासरावर झडप घातली. अवघ्या काही फुटांवर बिबट्याने वासरावर समोरासमोर हल्ला केल्याचे दृश्य पाहून सारिका भुजबळ या प्रचंड घाबरल्या. भीतीने त्या रडतच वस्तीच्या दिशेने ओरडत पळाल्या. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या दोन दुचाकीस्वारांनी त्यांना थांबवून रात्री उशिरा का पळत आहात, अशी विचारणा केली. त्यावेळी सारिका भुजबळ यांनी थरथरत्या आवाजात बिबट्याने वासरावर हल्ला केल्याचे सांगितले. सुरुवातीला दुचाकीस्वारांना विश्वास बसला नाही; मात्र त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहिले असता बिबट्या वासरावर हल्ला करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर सर्वांनी आरडाओरडा केला असता बिबट्याने वासराचा बळी घेत अंधारात पळ काढला. घटनेची माहिती तत्काळ राहुल भुजबळ यांना देण्यात आली. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ऋतिक भुजबळ यांनी घटनास्थळी येऊन तपासणी केली असता वासरू रक्ताच्या थारोळ्यात मृत झाल्याचे निष्पन्न झाले. घटनेनंतर काही वेळातच परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली असून वनमजूर हनुमंत पवार यांनी घटनास्थळी पंचनामा केला असल्याची माहिती राहुल भुजबळ यांनी दिली.
आता तरी दिवसा वीजपुरवठा द्या
वरचामळा परिसरात यापूर्वी कधीही बिबट्याचा वावर नव्हता. त्यामुळे पहिल्यांदाच घडलेल्या या घटनेमुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये तीव्र भीती पसरली आहे. रात्रीच्या वेळी शेतात, गोठ्यांमध्ये जाणे धोकादायक बनले असून जनावरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बिबट्याचे हल्ले सुरू झाल्याने शेतकऱ्यांमधून आता तीव्र संताप व्यक्त होत आहे. शेतीकामासाठी आणि जनावरांच्या देखभालीसाठी रात्रीच्या वेळी अडचणी येत असल्याने आता तरी शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसाच्या वेळेत वीजपुरवठा द्यावा, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. तसेच वनविभागाने तत्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशीही मागणी करण्यात येत आहे.
मी रोजच्याप्रमाणे गोठ्यात जनावरांना चारा टाकत होते. अचानक अंधारात काही हालचाल जाणवली आणि क्षणातच बिबट्याने माझ्या समोरच वासरावर हल्ला केला. काही कळायच्या आत सगळं घडलं. भीतीने माझे पाय थरथर कापत होते. जिवाच्या भीतीने मी तिथून पळाले. एवढ्या जवळून बिबट्या पाहिल्याने अजूनही धडधड वाढते आहे. या भागात कधीच असा प्रकार झाला नव्हता. आता रात्री शेतात किंवा गोठ्यात जाणे धोकादायक वाटत आहे.
- सारिका भुजबळ, महिला शेतकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

