मांडकीतील रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक
वाल्हे, ता. ३० : मांडकी (ता. पुरंदर) गावातील प्रमुख रस्त्यावर उभारण्यात आलेली गटार वाहिनीचे चेंबर आता ग्रामस्थांसाठी विकास नव्हे, तर संकट ठरत आहेत. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोरील मुख्य रस्त्याच्या मध्यभागीच सलग १० ते १५ चेंबर उभारण्यात आल्याने या मार्गावरून ये- जा करणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनचालकांसाठी हा रस्ता अक्षरशः अपघातांचा सापळा बनला आहे.
गावातील रस्त्यावर चेंबर बसविताना ग्रामस्थांनी वारंवार विरोध दर्शविला होता. मात्र, ग्रामस्थांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून ग्रामपंचायतीने हे काम केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्याच्या मधोमध उभारलेली ही चेंबर वाहतुकीस अडथळा ठरत असून, ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यातील काही चेंबर रस्त्याच्या पातळीपेक्षा अधिक उंच आहेत, तर बहुतांश चेंबरची झाकणे खोलगट झाल्याने वाहनचालकांना अंदाज येत नाही. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनचालकांचा अपघात होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत आहे. मांडकी येथील तलाठी कार्यालय ते ग्रामपंचायत कार्यालय चौक या दरम्यान जवळपास ५०० मीटर अंतरामध्ये ही चेंबर बसविण्यात आली आहेत. काही चेंबरभोवती खड्डे पडल्याने वाहनांचे नुकसान होत असून, अपघातांची शक्यता वाढल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
रस्त्याच्या मध्यभागी उभारलेली ही चेंबर तत्काळ हटवून रस्त्याच्या कडेला सुरक्षितरीत्या बसवावीत, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
मांडकी येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या गटार वाहिनीच्या चेंबरबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या चेंबरची पाहणी करण्यात येणार असून, आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती करून झाकणे समपातळीवर बसविण्यात येतील. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन तत्काळ योग्य ती कार्यवाही केली जाईल.
- मित जाधव, ग्रामसेवक, मांडकी
मुख्य रस्त्यावर गटार वाहिनीच्या चेंबरमुळे काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याची दखल घेतली जात आहे. ग्रामपंचायतीकडून लवकरात लवकर दुरुस्ती करून रस्त्याच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्यात येतील. नागरिकांनी काळजीपूर्वक वाहतूक करावी.
- अतुल जगताप, उपसरपंच, मांडकी
06076
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

