भविष्यातील शेतीसाठी शाश्वत जलसंधारणाचा आराखडा आवश्यक
भौगोलिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण असलेल्या पुरंदर तालुक्याला गेल्या अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनियमित पर्जन्यमान, भूजल पातळीतील घट, शेतीवरील वाढता खर्च आणि मर्यादित जलस्रोत यामुळे तालुक्यातील पाण्याचा प्रश्न अधिक तीव्र बनला आहे. या सर्व समस्यांचे मूळ एकच. ते म्हणजे पाण्याचे अपुरे संवर्धन. त्यामुळे भविष्यातील शेती, अर्थव्यवस्था आणि जीवनमान सक्षम करण्यासाठी शाश्वत जलसंधारणाचा सर्वसमावेशक आराखडा राबवणे काळाची गरज बनली आहे.
- किशोर कुदळे, वाल्हे
जलसंधारण म्हणजे केवळ पाणी साठवणे नव्हे, तर तालुक्याची शेती सक्षम करणे, अर्थव्यवस्था स्थिर करणे आणि नागरिकांचे जीवनमान उंचावणे ही व्यापक प्रक्रिया आहे. पुरंदर तालुक्यासाठी मांडलेले हे जलसमृद्धीचे व्हीजन प्रभावीपणे अमलात आले, तर दुष्काळाचा कायमचा अडसर दूर होऊन पुरंदर तालुका पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आणि शाश्वत विकासाच्या मार्गावर निश्चितपणे वाटचाल करेल
तर भूजल पातळीत वाढ
पुरंदर तालुक्यासाठी मांडण्यात आलेल्या जलसंधारणाच्या व्हीजनचा पहिला आणि महत्त्वाचा पाया म्हणजे संपूर्ण तालुक्याचा एकत्रित पाणलोट व्यवस्थापन आराखडा. तालुक्यातील प्रत्येक ओढा, नाला, नदीकाठ आणि नैसर्गिक जलप्रवाहांचे शास्त्रीय सर्वेक्षण करून त्या त्या परिसरात आवश्यक असलेली कामे निश्चित करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरवण्यासाठी नाले खोलीकरण, गाळ काढणे, लघु बंधारे, गाळकूप आणि पाण्याचा वेग नियंत्रित करणारी कामे नियमितपणे केली गेली, तर भूजल पातळी लक्षणीयरित्या वाढू शकते.
रेन वॉटर हार्व्हेस्टिंग अनिवार्य करण्यावर भर
व्हीजनमध्ये शेततळे हा कळीचा घटक मानण्यात आला आहे. प्रत्येक गावातील ठरावीक टक्के शेती क्षेत्र शेततळ्यांशी जोडले गेले, तर सिंचनासाठी स्थानिक पातळीवर पाणीसाठा उपलब्ध होईल. ओढे व नैसर्गिक जलप्रवाहांना जोडलेली शेततळ्यांची साखळी तयार केल्यास रब्बी हंगाम अधिक स्थिर बनेल. शेततळ्यांच्या कडेला वृक्षलागवड केल्यास माती धूप थांबेल आणि पाण्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर वर्षा जलसंचयन (रेन वॉटर हार्व्हेस्टिंग) ही व्यवस्था अनिवार्य करण्यावर भर देण्यात आला आहे. घरे, शाळा, ग्रामपंचायतीच्या इमारती तसेच सर्व सार्वजनिक कार्यालयांमध्ये पावसाचे पाणी साठवण्याची यंत्रणा कार्यान्वित केल्यास भूजल पुनर्भरण मोठ्या प्रमाणावर शक्य होईल. शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांत ही उपाययोजना प्रभावी ठरू शकते.
जुन्या तलावांचे पुनरुज्जीवन महत्त्वाचे
तालुक्यातील जुन्या तलावांचे पुनरुज्जीवन हेही जलसंधारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक तलाव गाळाने भरले आहेत. त्यांची साठवण क्षमता कमी झाली आहे. गाळ काढून त्यांची क्षमता वाढवणे, तलावाभोवती हरितपट्टा तयार करणे आणि दूषित पाणी तलावात जाणार नाही यासाठी स्थानिक नियमावली तयार करणे आवश्यक आहे. तलाव टिकले, तर गाव पातळीवर कायमस्वरूपी पाणीसाठा उपलब्ध राहतो.
युवकांनी ‘जलसैनिक’ बनून पुढाकार घ्यावा
जलसंधारण यशस्वी होण्यासाठी समाजाचा सक्रिय सहभाग अनिवार्य आहे. युवकांनी ‘जलसैनिक’ म्हणून काम करत जलसंवर्धनाच्या चळवळीत पुढाकार घ्यावा, महिलांना जलव्यवस्थापन प्रक्रियेत सामावून घ्यावे आणि शाळांमधून पाणी साक्षरतेचे उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. यासोबतच पाणी व्यवस्थापनाची डिजिटल नोंद ठेवून गावागावांत दरवर्षी ‘जलबँक ऑडिट’ केल्यास पाण्याचा वापर आणि साठवण अधिक शास्त्रीय पद्धतीने नियोजित करता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

