सायकल स्पर्धेचा सकारात्मक परिणाम; दुर्लक्षित रस्त्यांना नवसंजीवनी

सायकल स्पर्धेचा सकारात्मक परिणाम; दुर्लक्षित रस्त्यांना नवसंजीवनी

Published on

वाल्हे, ता. १७ : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुणे ग्रॅंड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेने ग्रामीण भागात केवळ क्रीडाविषयक चैतन्य निर्माण केले नसून, दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या विकासकामांना गती दिली आहे. या स्पर्धेच्या मार्गावर येणाऱ्या ग्रामीण भागाचे अनेक रस्ते वर्षानुवर्षे दुर्लक्षित होते. मात्र, या स्पर्धेच्या निमित्ताने त्या रस्त्यांचे रूपडे पालटत असून, ग्रामीण नागरिकांसाठी हा बदल दिलासादायक ठरतो आहे.
स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सायकलस्वारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशस्त, सरळ व गुळगुळीत रस्ते तयार करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर कामे सुरू आहेत. खड्ड्यांनी भरलेले रस्ते, अरुंद वळणदार मार्ग आणि जीर्ण झालेले डांबरीकरण आता भूतकाळ ठरत असून, अनेक गावांना जोडणारे अंतर्गत रस्ते नव्याने साकारले जात आहेत. याचा प्रत्यक्ष लाभ शेतकरी, शाळकरी विद्यार्थी, महिला आणि कामगार वर्गाला होत असून दैनंदिन प्रवास अधिक सोयीचा आणि सुरक्षित झाला आहे.
विशेषतः पुणे-पंढरपूर मार्गालगत असलेल्या जेऊर-मांडकी फाट्याजवळील भुयारी मार्गाचा प्रश्न अखेर मार्गी लागत असल्याने नागरिकांमध्ये समाधान आहे. दोन वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाने रेल्वे विस्तारीकरणाच्या वेळी उभारलेल्या या भुयारी मार्गात पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते. पावसाळ्यात हा मार्ग अक्षरशः जलमय होत असल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. वारंवार पाठपुरावा करूनही या समस्येकडे दुर्लक्षच होत होते. मात्र, सायकल स्पर्धेमुळे का होईना, अखेर या भुयारी मार्गाच्या दुरुस्तीला गती मिळाली आहे. सध्या येथे रस्त्याची दुरुस्ती, पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था तसेच संरक्षण भिंतींची रंगरंगोटी सुरू असून, त्यामुळे या मार्गाचे संपूर्ण रूपांतर झाले आहे.
आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमुळे वर्षानुवर्षे दुर्लक्षित असलेले रस्ते अखेर दुरुस्त होत आहेत. याचा फायदा सर्वसामान्य प्रवाशांना होणार आहे. तसेच, मार्गाच्या आकर्षक रंगरंगोटीमुळे परिसराचे सौंदर्य वाढले आहे. मात्र, यापुढील जेऊर गावापर्यंतच्या अंदाजे दोन ते अडीच किलोमीटर रस्त्याची अवस्था गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय दयनीय आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे असून, वाहनचालक व नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे उर्वरित जेऊर फाटा–जेऊर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी.
- अनंता तांबे, संचालक, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com