‘ग्रँड टूर’मुळे जिल्ह्यात फिटनेसचा जागर
वाल्हे, ता. २३ : क्रीडा व्यवस्थापन आणि सार्वजनिक आरोग्य तसेच वाहतूक, सुरक्षा आणि रस्ते व्यवस्थापनाची उत्तम सांगड घालत प्रशासनाने बजाज ‘पुणे ग्रॅंड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा यशस्वी करून दाखवली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकलपटूंच्या सहभागामुळे नागरिकांना जागतिक दर्जाचा अनुभव मिळाला, तर फिटनेस व आरोग्याविषयीची जाणीव ग्रामीण भागात अधिक दृढ झाली.
ग्रामीण भागातील रस्त्यांवरून धावणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायकलपटूंनी आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने स्पर्धेला विशेष रंगत आणली. या स्पर्धेनिमित्त मार्गावर असलेल्या गावांमध्ये स्वागताची विशेष तयारी करण्यात आली होती. नागरिक, युवक, महिला तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यांच्या दुतर्फा उभे राहून स्पर्धेचा आनंद घेत होते. स्पर्धकांचा ताशी ४० ते ५० किलोमीटर वेग, घाटातील वळणावळणाच्या रस्त्यांवर दाखवलेले कौशल्य, शिस्तबद्ध सायकलिंग व एकाग्रता पाहून नागरिक थक्क झाले. परदेशी सायकलपटूंच्या वेगवान व अचूक सायकल चालविण्याच्या शैलीने ग्रामस्थांनी विशेष आश्चर्य व्यक्त केले.या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेने केवळ क्रीडाविषयक चैतन्य निर्माण केले नाही तर ग्रामीण भागातील विकासकामांनाही चालना मिळाली. स्पर्धा मार्गावर येणारे अनेक रस्ते वर्षानुवर्षे दुर्लक्षित अवस्थेत होते; मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने या रस्त्यांचे नूतनीकरण झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हा बदल दिलासादायक ठरला आहे. या स्पर्धेमुळे नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांमध्ये सायकल चालविण्याबाबत आत्मविश्वास व उत्साह निर्माण झाल्याचे दिसून आले. अनेक विद्यार्थ्यांनी आपणही नियमित सायकल चालविणार असल्याची भावना व्यक्त केली. त्यामुळे अशा आंतरराष्ट्रीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय सायकल स्पर्धांचे आयोजन दरवर्षी करण्यात यावे, अशी मागणी नागरिक व विद्यार्थ्यांमधून होत आहे.
युवा पिढीच्या फिटनेससाठी आणि आरोग्यासाठी सायकलिंग अत्यंत उपयुक्त आहे. सायकल चालविल्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती, एकाग्रता व मानसिक स्वास्थ्य वाढते. अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते.
- प्रवीण किर्वे, मुख्याध्यापक, कामठवाडी प्राथमिक शाळा
‘बजाज पुणे ग्रॅंड टूर’सारख्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धांमुळे केवळ क्रीडाविषयक उत्साह निर्माण होत नाही, तर ग्रामीण भागातील युवक व शालेय विद्यार्थ्यांमध्ये फिटनेस आणि आरोग्याविषयी जागरूकता वाढते. प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे स्पर्धा सुरळीत पार पडली आणि विद्यार्थ्यांना सायकलिंगकडे वळण्याची प्रेरणा मिळाली. अशा स्पर्धांमुळे युवा पिढीची शारीरिक तंदुरुस्ती व मानसिक एकाग्रता दोन्ही वाढतात.
- सतीश निगडे, प्राचार्य, महर्षी वाल्मीकी विद्यालय, वाल्हे
स्पर्धा पाहून आम्हाला सायकल चालविण्याची खूप प्रेरणा मिळाली. आता आम्हीही रोज थोडी तरी सायकल चालवणार आहोत, त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहील.
- श्रीशाण भुजबळ, शालेय विद्यार्थी
वाल्हे या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमुळे आमच्या गावाचा आणि परिसराचा गौरव जगासमोर पोहोचला. ४० पेक्षा अधिक देशांतील सायकलपटूंनी आमच्या रस्त्यांवरून मार्गक्रमण केले आणि आमच्या ग्रामीण संस्कृतीला अनुभवले. हे पाहून खूप अभिमान वाटतो की आमचे छोटेसे गाव आता जागतिक नकाशावर दिसले. आमच्या गावातील परंपरा, उत्साह आणि विकासाचे प्रयत्न जगभर जाणारे आहेत याचा आम्हाला मोठा आनंद आहे, अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमुळे गावा-गावांमध्ये उत्साह तर वाढलाच पण फिटनेसचे महत्त्वही लक्षात आले.
- नितीनकुमार भोसले, ग्रामस्थ, नीरा
सायकलपटूंच्या कौशल्यामुळे आम्हाला सायकलिंगची मजा आणि फिटनेसचे महत्त्व समजले .स्पर्धा पाहून आमच्या मनात उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण झाला. भविष्यात अशा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची इच्छा वाटते.
- समृद्धी शिंदे, शालेय विद्यार्थिनी, नीरा
6272
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

