आडाचीवाडीत ‘बीडीओं’चा विकास पाहणी दौरा

आडाचीवाडीत ‘बीडीओं’चा विकास पाहणी दौरा

Published on

वाल्हे, ता. २४ : प्रशासन आणि लोकसहभाग यांची प्रभावी सांगड घालून गावाचा सर्वांगीण विकास कसा साधता येतो याचे उत्तम उदाहरण आडाचीवाडी (ता. पुरंदर) येथे पाहायला मिळते. या विकास मॉडेलचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यासाठी यशदा अंतर्गत राज्यातील विविध भागांतील ४० गटविकास अधिकाऱ्यांनी शनिवारी (ता. २४) आडाचीवाडी येथे पाहणी दौरा केला.
या पाहणी दौऱ्यात विविध भागांतील गटविकास अधिकाऱ्यांनी गावात प्रत्यक्ष फेरफटका मारत विविध विकासकामांची पाहणी केली. पाहणी
दौऱ्याची सुरुवात गावातील रस्ते व पायाभूत सुविधांपासून झाली. अधिकाऱ्यांनी गावांतर्गत रस्ते, पाणंद रस्ते तसेच जलसंधारणाची कामे पाहत त्याची उपयुक्तता जाणून घेतली. त्यानंतर ग्रामपंचायत इमारत, प्राथमिक शाळा अंगणवाडी, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, सांडपाणी व्यवस्थापन व्यवस्था, स्मशानभूमी विकास आणि व्यायामशाळा या सुविधांची पाहणी करण्यात आली. आबालवृद्धांसह लहान मुलांसाठी उभारण्यात आलेल्या नाना-नानी पार्कसह गावात उभारलेल्या ‘बोलक्या भिंती’ या उपक्रमाने अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. या पाहणी दौऱ्यात पुणे जिल्ह्यातील पहिल्या इस्राईल तंत्रज्ञानावर आधारित बायोगॅस प्रकल्पाची पाहणी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला.
या प्रकल्पामुळे पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीबरोबरच कचरा व्यवस्थापनासही हातभार लागल्याची माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली. यावेळी प्रत्येक ठिकाणी थांबून गटविकास अधिकाऱ्यांनी कामांची अंमलबजावणी कशी करण्यात आली निधीचा योग्य वापर कसा केला गेला आणि ग्रामस्थांचा सहभाग कसा मिळवण्यात आला याबाबत माहिती घेतली.
यावेळी सरपंच सुवर्णा पवार यांनी आडाचीवाडी ग्रामपंचायतीने राबवलेल्या विविध विकास योजनांची माहिती दिली. गावाच्या विकासात लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित करत गावचे रहिवासी व रायगडचे उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामस्थांचे सहकार्य वप्रशासनाची साथ यामुळेच आडाचीवाडीचा विकास शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्या शालिनी पवार, उपसरपंच मोहन पवार, शकुंतला पवार, अलका पवार, अरविंद पवार, सुरज पवार, अमित शिर्के, सागर पवार, बजरंग पवार आदी उपस्थित होते.


आडाचीवाडीत प्रशासन आणि लोकसहभाग यांच्या समन्वयातून नियोजनबद्ध पद्धतीने विकासकामे राबविण्यात आली आहेत.
जलसंधारण, रस्ते, स्वच्छता, पिण्याचे पाणी तसेच इस्राईल तंत्रज्ञानावर आधारित बायोगॅस प्रकल्प ही कामे विशेष उल्लेखनीय आहेत. ग्रामपंचायतीने राबवलेले हे विकास मॉडेल इतर गावांसाठी निश्चितच प्रेरणादायी असून अशा उपक्रमांचा अभ्यास इतर ठिकाणीही उपयुक्त ठरेल. -शरदचंद्र माळी, यशदा प्रकल्प, उपसंचालक

एखाद्या गावाचा कायापालट हा एका निर्णयाने होत नाही तर त्यामागे गावकऱ्यांची सामूहिक इच्छाशक्ती आणि प्रशासनाचे सक्षम मार्गदर्शन
आवश्यक असते. आडाचीवाडीमध्ये रहिवाशांनी विकासासाठी दाखवलेली एकजूट व येथील रहिवासी आणि रायगडचे उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेली प्रशासनाची भक्कम साथ यामुळे आज हे गाव विकासाच्या दिशेने ठोसपणे पुढे गेले आहे.
-बबनराव चखाले, विस्तार अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com