लग्नाआधीच काळाने घातला घाव

लग्नाआधीच काळाने घातला घाव
Published on

वाल्हे, ता. २७ : आनंदाच्या तयारीत असलेल्या एका कुटुंबावर क्षणात दुःखाचा डोंगर कोसळला. पुणे- मिरज रेल्वे मार्गावरील जेऊरफाटा (ता. पुरंदर) परिसरात मंगळवारी (ता. २७) सकाळी घडलेल्या रेल्वे अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रथमेश कुंडलिक तांबे (वय २५, रा. जेऊर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
सकाळच्या सुमारास जेऊर फाट्याजवळ रेल्वेमार्गावर अपघात झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांना मिळाली. यानंतर जेऊर येथील माजी
उपसरपंच ज्ञानेश्वर धुमाळ यांनी माजी पोलिस पाटील कुंडलिक तांबे यांना त्यांच्या पुतण्याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची माहिती दिली. घटनास्थळी पाहणी केली असता प्रथमेश याचा मृतदेह आढळून आला. तत्काळ नीरा पोलिस दुरक्षेत्राला माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच नीरा पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस हवालदार संदीप मदने, घनशाम चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. जेजुरी ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी उशिरा शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद नीरा पोलिस दुरक्षेत्रात करण्यात आली आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

प्रथमेश हा उच्चशिक्षित असून त्याने एम.एस्सी. पदवी प्राप्त केली होती. तो लोणंद एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत नुकताच
कायमस्वरूपी नोकरीस लागला होता. नोकरी पक्की झाल्यानंतर त्याचे लग्न ठरले होते. फेब्रुवारी महिन्याच्या २२ तारखेला विवाह असल्याने घरात लग्नाची तयारी सुरू होती. सोमवारी (ता. २६) रात्रपाळी करून तो मंगळवारी (ता. २७) सकाळी घरी आला होता. चहा पिऊन मित्राकडे जाऊन येतो असे सांगून घराबाहेर पडलेला प्रथमेश परत आलाच नाही. त्याऐवजी त्याच्या मृत्यूची बातमी कुटुंबीयांवर कोसळली.
लग्नाच्या तयारीत असलेल्या घरावर अचानक काळाने घाला घातल्याने जेऊर गावात हळहळ व्यक्त होत आहे. प्रथमेशच्या पश्चात
आई, वडील आणि लहान भाऊ आहेत. ही घटना केवळ कुटुंबापुरती मर्यादित न राहता, तरुणांच्या सुरक्षा आणि रेल्वे मार्गावरील दक्षतेचा संदेश देणारी ठरली असल्याचे सोमेश्वरचे संचालक अनंता तांबे यांनी सांगितले.

अंत्ययात्रेचा धक्का
लग्नाच्या तयारीत असलेल्या घरावर अचानक काळाचा डोंगर कोसळला. हातावर मेहंदी, डोळ्यांत स्वप्ने, मनात आनंद सर्व काही क्षणात विस्कटल्यासारखे झाले. जेमतेम काही दिवसांत लग्नाच्या बोहल्यावर चढायचा होता पण आज त्या घरात शोकाचे निळे आकाश पसरले आहे. प्रथमेशच्या जाण्याने संपूर्ण गाव हळहळीत गुंजले आणि या दुःखद घटनेने जीवनातल्या अनिश्चिततेची आणि तरुणांच्या सुरक्षिततेची जाणीव पुन्हा एकदा जागृत केली.

06305

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com