आम्ही कायम दादांच्या ऋणात राहू
वाल्हे, ता. ३१ : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान दुर्घटनेतील निधनाने वाल्हे (ता. पुरंदर) परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. निधनानंतर वाल्हेकरांनी दोन दिवस कडकडीत बंद पाळला. शनिवारी (ता. ३१) बाजारपेठमध्ये सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी दादांच्या आठवणी जागवत त्यांनी गावासाठी केलेल्या विकासकामांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ‘आम्ही कायम दादांच्या ऋणात राहू,’ अशा भावना व्यक्त करत अनेकांना अश्रू अनावर झाले.
शोकसभेच्या सुरुवातीला अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गा़डे, भाजपचे सचिन लंबाते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी सभापती गिरीष पवार, शिवसेनेचे सागर भुजबळ, सरपंच अतुल गायकवाड, सुकलवाडीचे सरपंच संदेश पवार, दत्तात्रेय पवार, अॅड. फत्तेसिंग पवार, अमोल खवले, सूर्यकांत पवार, उपसरपंच सागर भुजबळ, अमित पवार, किरण कुमठेकर, मनोज भुजबळ, अमोल भुजबळ, राजेंद्र गायकवाड, दादासाहेब मदने, नीलेश पवार आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
‘‘अजितदादा म्हणजे केवळ नेता नव्हते, तर सामान्य माणसाचा आधार होते. दिलेला शब्द शेवटपर्यंत पाळणं, कामात शिस्त आणि निर्णयात
स्पष्टता, ही त्यांची खरी ओळख होती. त्यांच्या आकस्मिक महाराष्ट्राने एक कर्तव्यदक्ष, लोकाभिमुख नेता गमावला आहे. ही हानी कधीही भरून न निघणारी असून त्यांच्या आठवणी आणि कार्य कायम प्रेरणा देत राहील,’’ असे भावनिक मत व्यक्त करताना डॉ. दिगंबर दुर्गाडे यांचा कंठ दाटून आला.
‘‘माझी अजित पवार यांच्याशी काही वेळाच भेट झाली होती; पण त्या थोड्याशा भेटीतही त्यांची आपुलकी आणि माणुसकी प्रकर्षाने जाणवली. पक्ष
वेगळा असला, तरी संवादात कुठेही दुरावा नव्हता. सामान्य कार्यकर्त्याशीही ते मोकळेपणाने बोलायचे, मार्गदर्शन करायचे. महाराष्ट्राने एक अनुभवी, शब्दाला जागणारा नेता गमावला,’’ अशी खंत सचिन लंबाते यांनी व्यक्त केली.
‘‘आम्ही पक्ष वेगळा असलो तरी अजित पवार यांच्या अंत्यविधीसाठी बारामतीला गेलो होतो. त्या ठिकाणी उसळलेली प्रचंड गर्दी, लोकांचे अश्रू
आणि गहिवरलेली मने पाहून अंगावर काटा आला. एक नेता किती लोकांच्या मनात घर करून होता, याची ती जिवंत साक्ष होती. लोक अक्षरशः रडत होते. त्या दृश्याने मन हेलावून गेलं. अजितदादांची माणुसकी, आपुलकी आणि कामाची पद्धत लोकांच्या हृदयात कायमची कोरली गेली,’’ गिरीष पवार यांनी सांगितले.
अनिल भुजबळ यांनी प्रास्ताविक केले. दीपक कुमठेकर यांनी आभार मानले.
अश्रूंचे बांध फुटले
यावेळी अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अजित पवार यांच्या आवाजातील भावनिक भाषण सभागृहात ऐकविण्यात आले. दादांचा परिचित, ठाम आणि आपुलकीचा आवाज जणू पुन्हा एकदा उपस्थितांशी संवाद साधत होता. ‘मी तुमच्यासोबत आहे’ अशीच साद त्या आवाजातून उमटताच सभागृहातील उपस्थितांना भावना आवरणे अशक्य झाले. क्षणातच शोकसभेचे वातावरण अधिक गहिवरून गेले. अनेकांच्या डोळ्यांतून अश्रूंचे बांध फुटले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

