सायकल टूरमुळे ग्रामीण रस्त्यांचा विकास
वाल्हे, ता. २ : बजाज पुणे ग्रॅंड चॅलेंज टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमुळे ग्रामीण भागात क्रीडात्मक उत्साहासोबतच विकासाचे नवे पर्व सुरू झाले असून, स्पर्धेच्या मार्गावरील दुर्लक्षित रस्त्यांचा कायापालट झाला आहे. याच मार्गावरून वीर (ता. पुरंदर) येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थानच्या दहा दिवसांच्या यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक ये-जा करत असतात; मात्र आतापर्यंत खड्डेमय व धोकादायक असलेला वाल्हे-हरणी मार्ग सुधारल्याने भाविकांच्या सुरक्षित व सुलभ प्रवासाचा प्रश्न सुटला आहे.
दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या बजाज पुणे ग्रॅंड चॅलेंज टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमुळे या मार्गाचे भाग्य उजळले आहे. स्पर्धेच्या
निमित्ताने या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली असून, खड्डेमय रस्ता गुळगुळीत करण्यात आला आहे. तसेच घाटमाथ्यावरील धोकादायक वळणांवर आवश्यक ठिकाणी लोखंडी बॅरिकेड व संरक्षक जाळ्या बसविण्यात आल्याने भाविकांसाठी प्रवास अधिक सुरक्षित झाला आहे. या मार्गावरील सुधारित रस्त्यांचा थेट लाभ सध्या वीर यात्रेला जाणाऱ्या भाविकांना मिळत असून, सुरक्षित व सुलभ प्रवासामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या इतर वाहनचालकांनाही याचा मोठा फायदा होत आहे.
पुणे ग्रॅंड चॅलेंज टूर ही स्पर्धा केवळ सायकलिंगपुरती मर्यादित न राहता ग्रामीण भागातील रस्तेविकास, सुरक्षितता आणि सौंदर्यीकरण यांना
चालना देणारी ठरत आहे. क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण विकास घडवून आणण्याचे हे उत्तम उदाहरण असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
मी दररोज वाल्हे येथून काळदरी येथे नोकरीसाठी प्रवास करतो. या मार्गावरील रस्त्याची अवस्था पूर्वी अत्यंत दयनीय असल्याने रोज मोठा त्रास सहन करावा लागत होता. मात्र नुकत्याच झालेल्या सायकल स्पर्धेमुळे रस्त्याची दुरुस्ती होऊन प्रशस्त व सुरक्षित रस्ता तयार झाला असून, आता प्रवास अधिक सुखकर झाला आहे.
- प्रा. संतोष नवले, प्रवासी (पुरंदर)
आम्ही दरवर्षी वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थानच्या यात्रेसाठी या मार्गावरून ये-जा करतो. मात्र यापूर्वी रस्ता खड्डेमय व धोकादायक
असल्याने मोठा त्रास सहन करावा लागत होता. आता बजाज पुणे ग्रॅंड चॅलेंज टूरमुळे रस्त्याची दुरुस्ती होऊन सुरक्षित व्यवस्था केली आहे.
- संदीप घिसरे, वडकी
गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता दुर्लक्षित अवस्थेत होता. नुकत्याच झालेल्या बजाज पुणे ग्रॅंड चॅलेंज टूरमुळे फक्त रस्त्याची दुरुस्तीच नाही तर रुंदीकरण केले गेले आणि धोकादायक ठिकाणी संरक्षण जाळी व बॅरिकेड्स बसविले आहेत. स्पर्धेच्या मार्गावरून गेल्यामुळे फक्त मुख्य रस्ता नाही तर गावाशी जोडणारा पाऊण किलोमीटरचा रस्ता देखील संबंधित विभागाने ग्रामस्थांच्या मागणीनुसार सुधारून दिला. यामुळे ग्रामस्थांची रस्त्याबाबतची अडचण दूर झाली आहे.
- विकास यादव, माजी सरपंच, हरणी (पुरंदर)
मी पिसुर्टी (ता. पुरंदर) येथे नोकरीनिमित्त दररोज प्रवास करतो. वीर ते पिसुर्टी मार्गावर पूर्वी रस्ता उखडलेला व वेड्यावाकड्या वळणांनी भरलेला होता, दुचाकीवरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत होती. मात्र नुकत्याच झालेल्या ग्रॅंड टूरमुळे रस्ता मजबूत व सुरक्षित झाला असून, आता प्रवास सोईस्कर झाला आहे.
- योगेश राऊत, वीर (पुरंदर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

