पिसुर्टीकरांकडून दादांना श्रद्धांजली

पिसुर्टीकरांकडून दादांना श्रद्धांजली

Published on

वाल्हे, ता. ३ : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालक मंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून, पिसुर्टी (ता. पुरंदर) गावातही त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करण्यात आला. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने शिस्तप्रिय, लोकाभिमुख आणि प्रभावी नेतृत्व गमावले आहे, अशा भावना यावेळी ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
पिसुर्टी येथील ग्रामदैवत मंदिराच्या सभामंडपामध्ये सोमवार (ता. २) रोजी ग्रामस्थांच्या वतीने शोकसभेचे आयोजन केले होते. शोकसभेच्या प्रारंभी दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेस माजी सरपंच अशोक बरकडे व धनगर समाज उन्नती मंडळाचे सचिव माणिकराव चोरमले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
‘‘अजितदादा पवार हे शिस्तप्रिय, कणखर आणि विकासाभिमुख नेतृत्व होते. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी ते नेहमी तत्पर असत. त्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राने एक प्रभावी आणि लोकाभिमुख नेता गमावला आहे. ही हानी कधीही भरून न निघणारी आहे,’’ असे मत माजी सरपंच अशोक बरकडे यांनी व्यक्त केले.
अजितदादा पवार हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेणारे मार्गदर्शक होते. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याची त्यांची तळमळ कायम स्मरणात राहील. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे,’’ असे माणिकराव चोरमले यांनी सांगितले.
यावेळी उपस्थितांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. विकासाभिमुख नेतृत्व, कडक प्रशासकीय शिस्त आणि सर्वसामान्यांशी असलेली नाळ यामुळे अजित पवार हे कायम स्मरणात राहतील, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
या शोकसभेस संतोष महाराज बरकडे, बाळासाहेब चोरमले, नवनाथ बरकडे, दिलीप बरकडे, विशाल बरकडे, सुखदेव बरकडे, दादा बरकडे, ऋषिकेश बरकडे, खंडू चोरमले, शुभम बरकडे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com