वाल्हे येथे भावपूर्ण श्रद्धांजली
वाल्हे, ता. ४ : वाल्हे (ता. पुरंदर) येथे बुधवारी (ता. ४) दुपारी अजित पवार यांचा अस्थिकलश असलेला रथ दाखल होताच जणू संपूर्ण गावाचे काळीज थरथरले. रथाचे दर्शन होताच अनेकांचे डोळे पाणावले, गळे दाटून आले आणि पावले आपोआप रथाच्या दिशेने वळली. हातात पुष्प, डोळ्यांत अश्रू आणि मनात असह्य वेदना घेऊन वाल्हेकरांनी जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी अजित दादा अमर रहे अशा घोषणा देत उपस्थितांनी रथावर पुष्पवृष्टी केली. यावेळी महिला, ज्येष्ठ नागरिकांसह तरुणवर्ग अश्रू ढाळत होते. अजूनही हे सगळं खरं वाटत नाही, अशी भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. यानंतर अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला. अबालवृद्ध, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व स्तरातील नागरिकांनी शिस्तबद्ध रांगेत उभे राहून अस्थिकलशाचे दर्शन घेतले.
यावेळी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, जालिंदर कामठे, माजी सभापती गिरीश पवार, सरपंच अतुल गायकवाड, दत्तात्रेय पवार, महादेव चव्हाण, अमोल खवले, सत्यवान सूर्यवंशी, संभाजी पवार, गोरख कदम आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
‘‘अजित पवार हे केवळ नेते नव्हते, तर सामान्य माणसाचा आधार होते. स्पष्टवक्तेपणा, निर्णयातील ठामपणा आणि कामातील वेग ही त्यांची ओळख होती. प्रशासनावर मजबूत पकड ठेवून सामान्य माणसाला न्याय देणारे नेतृत्व म्हणून त्यांनी जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या जाण्याने पुरंदर तालुकाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला आहे,’’ अशी भावना पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी व्यक्त केली.
अस्थिकलश दर्शन शांततेत व सन्मानपूर्वक पार पडावे, यासाठी उपसरपंच सागर भुजबळ, दीपक कुमठेकर, तेजस दुर्गाडे, त्रिंबक भुजबळ, महेश पवार, सतीश पवार, सचिन जाधव, अरविंद पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.०
दिवंगत अजित पवार यांच्या अस्थिकलशाचे विसर्जन गुरुवारी (ता. ५) सायंकाळी ५ वाजता जेजुरी (ता. पुरंदर) नजीक कऱ्हा नदीमध्ये विधीवत विसर्जन करण्यात येणार आहे. या अस्थिविसर्जन कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जालिंदर कामठे यांनी केले आहे.
06368
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

