वाल्हेत टाळ, मृदंगाचा गजर
वाल्हे, ता. ५ : सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ।। गोड तुझे रूप गोड तुझे नाम । देई मज प्रेम सर्व काळ ।। विठो माउलिया हाचि वर देई । संचरोनि रोही हृदयामाजी ।। तुका म्हणे काही न मागे आणीक । तुझे पायी सुख सर्व आहे ।। या अभंगातून संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन सोहळ्याचे वर्णन झाले. टाळ मृदंगाचा गजर टिपेला पोचला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठलाचा जयघोष झाला आणि शेकडो हातांनी गुलाल पुष्पाचा वर्षाव करून संत तुकाराम महाराजांचा ३७८ वा बीज सोहळा गुरुवार (ता. ५) वाल्हे (ता. पुरंदर) येथील आद्यरामायणकार महर्षी वाल्मिकीऋषी मंदिरामध्ये भक्तिभावाने साजरा झाला.
पहाटे महर्षी वाल्मिकीऋषी समाधीसह संत तुकाराम यांच्या प्रतिमेची बबनमहाराज भुजबळ यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. विठूनामाच्या गजरात मंदिर परिसर भक्तिभावाने न्हाहला होता. यावेळी मान्यवरांच्या हस्ते तुकाराम महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. बीजेनिमित्त सकाळपासूनच भाविकांनी तुकाराम महाराजांच्या प्रतिमेच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी माजी सभापती गिरीश पवार, माजी सरपंच अमोल खवले, बाळासाहेब भुजबळ, दादासाहेब मदने, दत्तात्रेय पवार, कैलास गायकवाड, प्रताप पवार, प्रशांत पवार, रवींद्र भोसले, अनिल महाराज पवार, सोमनाथ गायकवाड, शंकर पवार, कुंडलिक पवार, उमेश पवार आदी उपस्थित होते.
महर्षी वाल्मीकी भजनी मंडळाच्या वतीने कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. होळ (ता. फलटण) येथील कीर्तनकार साहेबराव पढेर महाराजांनी संत तुकाराम महाराजांचे अभंग गायले आणि भाविकांना मंत्रमुग्ध केले. कीर्तनाला विनायक पवार, विनायक सुतार, मोहन पवार यांनी साथ दिली. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शेकडो भाविकांनी प्रतिमेला पुष्प वाहुन हा बीज सोहळा पार पाडला. त्यानंतर सामूहिक आरती
करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दिलीप नाझरे, हनुमंत नाझरे, दीपक नाझरे, राजेंद्र गायकवाड, राजेंद्र काळंगे, मारुती रोकडे, नरेंद्र ढवळे, नीलेश कुदळे यांनी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

