

वाल्हे, ता. २३ : पिंगोरी ग्रामपंचायतीतील सरपंचपदाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिलेल्या आदेशात झालेल्या त्रुटीमुळे प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुनावणीत एका बाजूचा दावा फेटाळून दुसऱ्याचे पद कायम ठेवण्याचा निर्णय असताना, लेखी आदेशात मात्र तक्रारदारालाच सरपंचपद बहाल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पिंगोरी ग्रामपंचायत निवडणूक प्रकरणी ओबीसी प्रवर्गातील संदीप यादव यांच्या निवडीवर आक्षेप घेत सागर सुतार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले होते. यादव यांनी कुणबी जातीचा दाखला सादर केला असला तरी त्याची वेळेत पडताळणी न केल्याचा मुद्दा सुतार यांनी उपस्थित केला होता.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सुतार यांचे अपील फेटाळत यादव यांचे सरपंचपद कायम ठेवण्याचा निर्णय दिला. त्यामुळे वाद मिटल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, प्रत्यक्ष लेखी आदेश समोर आल्यानंतर प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा नमुना उघड झाला आहे.
आदेशात अपील फेटाळल्याचा स्पष्ट उल्लेख असला तरी तक्रारदाराचे नावच नमूद केले नाही. इतकेच नव्हे, तर सरपंचपद कायम ठेवताना संदीप यादव यांच्याऐवजी सागर सुतार यांचे नाव टाकण्यात आले आहे. परिणामी, ज्या व्यक्तीचे अपील फेटाळण्यात आले, त्यालाच सरपंचपदावर कायम ठेवल्याचा विचित्र प्रकार घडला आहे.
या आदेशाचा आधार घेत सुतार यांनी प्रशासनाकडे सरपंचपद देण्याची मागणी केली आहे. ‘‘माझे अपील फेटाळले असले, तरी आदेशात मला सरपंच म्हणून नमूद केले आहे. त्यामुळे आदेशाची अंमलबजावणी व्हावी’’, अशी सुतार यांची भूमिका आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.