‘आता मुलाला काय खाऊ घालू, कसं जगू...’

‘आता मुलाला काय खाऊ घालू, कसं जगू...’

Published on

बेलाजी पात्रे
सकाळ वृत्तसेवा
वाकड, ता. २० : ‘आता मुलाला काय खाऊ घालू, कसं जगू...’ घराची अन् स्वप्नांचीही राखरांगोळी झालेल्या घरासमोर उभ्या राहून डोळ्यांतून ओघळणारे अश्रू कसेबसे रोखत सुमन राठोड भावनांना वाट मोकळी करून देत होत्या.
वाकड परिसरातील मुंजोबा नगरमध्ये शॉर्ट सर्कीटमुळं लागलेल्या आगीत या माऊलीचा आणि तिच्या एकुलत्या एक मुलाचा जीव वाचला, पण पै-पैका, भांडी-कुंडी, कपडा-लत्ता असं सारं काही आगीत खाक झालं. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी पतीने साथ सोडल्याने ही माय-लेकरं दोघचं राहतात. गेली अनेक वर्षे रोजंदारीवर काम माऊली मुलाला वाढविताना यांनी आई-वडीलांचीही भूमिका निभावतं आहे. उन्हातान्हात, पावसात, उपाशीपोटीही तिने कष्टाची पराकाष्ठा केली; पै-पै साठवून छोटंसं घरटं उभारलं. परंतु नियतीला कदाचित हे सुख मान्य नव्हतं. अचानक लागलेल्या आगीने त्यांना रस्त्यावर आणलं.
अग्निशामक दलाच्या दोन बंबांनी आग आटोक्यात आणली मात्र, तोपर्यंत सर्व काही संपलं होतं. अंथरूण-पांघरूण, धान्य, मुलाचं शाळेचं साहित्य असं सारं काही खाक झालं. ‘पंधरा वर्षं झिजून उभारलेलं सगळं एका क्षणात गमावलं,’ असं म्हणताना त्यांचा कंठ दाटून येतो.
आगीत कपाटातील मंगळसूत्र, कर्णफुले, सुमारे १५ हजार रुपयांची रोख रक्कमही भस्मसात झाली. सुमन यांच्या डोळ्यांत अश्रू असले तरी केवळ एक महिला नव्हे, तर संघर्ष करणारी आई म्हणून
ही माऊली कोलमडलेली नाही.
---

जिद्द सोडून सर्वस्व गमावलं...

आगीमुळे सुमन राठोड यांनी जिद्द सोडून सर्वस्व गमावलं आहे, पण मुलाकडं बघत पुन्हा पायावर उभे राहण्याचा या माऊलीचा निर्धार आहे. आता संकटसमयी त्यांना समाजाच्या आधाराची आणि मदतीची नितांत गरज आहे. तिला समाजाच्या सहकार्याची नितांत गरज आहे. आर्थिक मदत, धान्य, कपडे, भांडी, शालेय साहित्य अशी कोणतीही मदत त्यांच्या आयुष्यात नव्या प्रारंभाचा दीप प्रज्वलित करू शकते. दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. एका आईच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी आणि तिच्या मुलाच्या भविष्यासाठी आशेचा किरण पेटवण्यासाठी आपली छोटीशी मदतही अमूल्य ठरू शकते.
------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com