लावणीची रंगत अन् जेवणाची पंगत
यवत, ता. १६ : केडगाव-चौफुला (ता. दौंड) येथील न्यू अंबिका कलाकेंद्रात शुक्रवारी (ता. १६) वारकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती. त्याचबरोबर वारकऱ्यांच्या मनोरंजनासाठी खुल्या रंगमंचावर लावण्यांच्या कार्यक्रमाचेही आयोजन केले होते. दरवर्षी असे आयोजन येथे करण्यात येत असल्याचे कला केंद्राचे मालक डॉ. अशोक जाधव यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या रंगभूमी परीक्षा निरीक्षण मंडळाचे सदस्य राहिलेल्या डॉ. अशोक जाधव व त्यांच्या पत्नी जयश्री जाधव हे भाविक वृत्तीचे आहेत. त्यांच्या कलाकेंद्रात व्यावसायासोबत सर्व राष्ट्रीय सण व विविध धर्मांचे धार्मिक सण सातत्याने साजरे केले जातात. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा कला केंद्राच्या दारातून जातो. त्यादिवशी व्यवसाय बंद ठेऊन सर्व कला केंद्र वारकऱ्यांच्या सेवेत मग्न असते.
येथे दहा हजारांहून अधिक वारकरी येथील भोजनाबरोबरच मनोरंजनाचाही आनंद घेतात. कलाकेंद्रातील नर्तिका, वादक व इतर कामगार असे दीडशेहून अधिक कलाकार वारकऱ्यांच्या सेवेत दिवसभर व्यग्र राहतात. अभंग आणि लावणी यांची जुगलबंदी हे येथील कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असते. साजशृंगार केलेल्या नर्तिका वारकऱ्यांना आग्रहाने एकीकडे जेवण वाढत असतात. तर, दुसरीकडे त्यांच्या नृत्यातून मनोरंजनही करत असतात. कला केंद्राच्या प्रांगणात एकाच वेळी दिडशे ते दोनशे वारकरी पंगतीत बसून जेवणाचा आनंद घेत असतात. त्याच वेळी बाहेरील वाहनतळाच्या मैदानात उभारलेल्या मंचावर नृत्याचा कार्यक्रमही सुरू असतो.
रोज एकाच कामात राहिलो तर आयुष्य कंटाळवाणे होऊन जाते. आपल्या परंपरेत त्याचसाठी अनेक सण समारंभाची योजना आहे. त्या त्या वेळी ते ते मनोभावे साजरे केले, तर आपला उत्साह वाढतो टिकतो. वारकऱ्यांच्या सेवेचे मोठे समाधान आम्हा सर्व कलाकारांना मिळत असते. वारकरीही आमच्या आग्रहाचा मान ठेवतात. आमची सेवा गोड मानून घेतात. याचा मोठा आनंद आम्हाला वाटतो.
- डॉ. अशोक जाधव, कला केंद्राचे मालक
००८०५
००८०४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

