ओल्या करप्यामुळे फूल उत्पादक धोक्यात
यवत, ता. २७ : यवत परिसरात फुलांवर वाढत असलेल्या ओला करपा या बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भाव चांगलाच वाढत आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे हा प्रादुर्भाव वाढत असल्याने फुलशेती धोक्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्पादनाची चांगली अपेक्षा असताना करप्यामुळे फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
यवत परिसरातील यवत, भरतगाव, कासुर्डी, बोरीऐंदी, ताम्हाणवाडी, भांडगाव या भुलेश्वर डोंगररांगेच्या पायथ्याच्या शिवारात मोठ्या प्रमाणात फूल शेती केली जाते. या परिसरात सध्या दीडशे ते दोनशे हेक्टर क्षेत्र फूल शेतीखाली असल्याचा अंदाज आहे. यांपैकी बहुतांश क्षेत्र ओला करपा या रोगास बळी पडले आहे. या भागात नवीन लागण केलेल्या पिकांपासून तोडणीला आलेल्या फुलपिकांपर्यंत सर्वच फुलशेतीला करप्याने वेढले आहे. या परिसरात मागील अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात फूल शेती केली जाते. येथील फूल शेतकऱ्यांचा पुणे, मुंबई, कल्याण, हैदराबाद या फूल बाजारांमध्ये चांगलाच दबदबा आहे. या फुलबाजारातील अनेक आडते यवत परिसरातील शेतकऱ्यांच्या संपर्कात असतात. श्रावण महिना, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दीपावली व पुढे सुरू होणारी लग्नसराईला डोळ्यासमोर ठेऊन फूल लागवडीचे नियोजन केले जाते. लागणी नुसार तो तो विक्रीहंगाम शेतकऱ्यांना सापडला तर त्यांना अधिक आर्थिक फायदा होतो. मात्र कोणत्याही अस्मानी- सुलतानी संकटामुळे हे गणित कोलमडले तर मात्र आर्थिक नुकसान ठरलेले असते. गणेशोत्सवात फुलांना अधिक मागणी असते. या हंगामाच्या तोंडावर करप्याचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे.
गणेशोत्सवाच्या काळात फुलांना चांगली मागणी असते. या काळात फुले विक्रीला येतील असे लागवडीपासूनच नियोजन केलेले असते. या नियोजनाने लागवड केलेले फुलांचे फड आता ऐन जोमात आहेत. त्यांचे या पावसामुळे व त्यामुळे वाढत चाललेल्या करप्याच्या प्रादुर्भावाने मोठेच नुकसान होत आहे.
- प्रवीण इंगळे, शेतकरी व मा. ग्रामपंचायत सदस्य भरतगाव (ता. दौंड)
अधिक काळ पाऊस राहिल्याने फूल पिकांच्या पानावर ओला करपा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे, ही वस्तुस्थिती आहे. परिसरात हा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणात आहे. त्यावर बुरशीनाशकाची फवारणी करणे हाच सध्या तरी आपल्या हाती असलेला उपाय आहे. शेतकऱ्यांनी हा उपाय करीत राहिले पाहिजे.
- विनायक जगताप, कृषी सहाय्यक, यवत (ता. दौंड)
01204
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

