जिरायती भागातील पाऊस खरिपाच्या पथ्यावर
यवत, ता. १४ : दौंड तालुक्यात यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाने वार्षिक सरासरीला गवसणी घातली आहे. लवकर सुरू झालेल्या पावसाने फुले, तरकारी, कांदा यांसारख्या प्रामुख्याने बागायती क्षेत्रातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, या पावसाचा जिरायती क्षेत्रात खरीप हंगामाला चांगला उपयोग होईल, अशी आशा कृषी विभागाकडून व्यक्त केली जात आहे.
मे महिन्यात सुरू झालेल्या जोरदार पावसाने दौंड तालुक्यातील सुमारे २९०० हेक्टर क्षेत्रावरील वेगवेगळी पिके बाधित झाली आहेत. त्यांचे नुकतेच कृषी व महसूल विभागाकडून पंचनामे करण्यात आले. याचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला असून, शासनाकडून एकूण सुमारे पाच कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित आहे. तर दुसरीकडे याच पावसाचा खरीप हंगामाला चांगला उपयोग होऊ शकेल, अशी आशाही कृषी विभागाकडून व्यक्त केली जात आहे. खरीप हंगामाच्या पेरण्यांचा कालावधी साधारणपणे १५ जून ते १५ जुलैपर्यंत असतो. लवकर सुरू झालेल्या पावसामुळे काही शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करून लवकर पेरण्या केल्या. पावसाने थोडी उघडीप देताच त्यांनी पेरण्या केल्या खऱ्या मात्र पुन्हा हजेरी लावलेल्या पावसाने त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आणली आहे. पेरणीचा हंगाम आता सुरू व्हायचा आहे. समाधानकारक पावसामुळे जमिनीत चांगली ओल निर्माण झाली आहे. वाफशाची स्थिती विचारात घेऊन आता पेरण्या करण्यास हरकत नाही.
दौंड तालुक्यात खरिपाचे सुमारे साडेबारा हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र आहे. या वर्षी समाधानकारक पावसामुळे शंभर टक्के क्षेत्रावर पेरणी होणार असल्याचा अंदाज आहे, अशी माहिती कृषी अधिकारी राहुल माने यांनी दिली.
पीकनिहाय क्षेत्र (हेक्टरमध्ये)
बाजरी.......४ हजार ५००,
मका.......३ हजार,
कापूस .......१ हजार २००
कडधान्य.......५००
गळीत धान्य.......५००
भाजीपाला, चारा व इतर पिके.......२ हजार ५००
लवकर सुरू झालेल्या पावसाने फुले, टोमॅटो व साठवलेला कांदा यांचे मोठे नुकसान झाले. पावसाने थोडी उघडीप देताच जिरायती भागात पेरण्यांचा धडाका सुरू झाला. कृषी विभागाने पेरणीची घाई करू नका असे आवाहन केले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे दुबार पेरणीची नामुष्की आमच्यावर आली आहे.
- प्रवीण इंगळे, शेतकरी भरतगाव (ता. दौंड)
01400
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.