सरकारचा रात्रीस खेळ चाले...!
कोरोना सारखाच ओमिक्रॉनही बहुधा निशाचर असावा. त्याला रोखण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा रात्रीची जमावबंदी लागू करून अनिश्चिततेचे वातावरण तयार केले आहे.
कोरोना (Corona) सारखाच ओमिक्रॉनही (Omicron) बहुधा निशाचर असावा. त्याला रोखण्यासाठी राज्य सरकारने (State Government) पुन्हा एकदा रात्रीची जमावबंदी लागू करून अनिश्चिततेचे वातावरण (Environment) तयार केले आहे. संभाव्य धोका (Danger) टाळण्यासाठी टाकलेले हे पाऊल असले तरी ते किती व्यवहार्य आहे, याचा विचार व्हायला हवा. जमावबंदी किंवा लॉकडाउनशिवाय सर्व व्यवहार सुरू ठेवून सुरक्षेच्या उपाययोजना करण्यावरच यापुढे भर द्यावा लागेल अन्यथा कोरोनापेक्षाही भयंकर आर्थिक, सामाजिक परिणामाला सामोरे जावे लागेल.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे भीषण चटके सर्वजण सहन करीत आहोत. कोरोनाबाबत आलेली जागरूकता, उपचारांची सेट झालेली पद्धती आणि लसीकरण यामुळे कोरोनाला रोखण्यात आपल्याला बऱ्याच अंशी यश आले आहे. १८ वर्षावरील बहुतांश नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. तरीही ओमिक्रॉनच्या भीतीने सरकारच पुन्हा बंधने लादण्याच्या मनःस्थितीत दिसते. त्याचमुळे नाताळ आणि नववर्षाच्या तोंडावर रात्रीची जमावबंदी लावून एक मोठा झटका दिला आहे. हा निर्णय कोणते निकष लावून घेतला हे माहीत नाही, पण त्यामुळे बाजारात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले हे नक्की.
एखाद्या रस्त्यावर गर्दी होतेय मग तो रस्ताच वाहतुकीसाठी बंद करून टाका, असा सोपा पर्याय पोलिस निवडतात, पण त्या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहतुकीचे काय? त्याला कोणता पर्यायी मार्ग आहे का? त्या रस्त्याच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांचे काय, याचा विचार होत नाही. अगदी त्याच पद्धतीने ओमिक्रॉनच्या भीतीने पर्यायी उपाययोजना करण्याऐवजी जमावबंदीचा सरधोपट मार्ग सरकारने निवडलेला दिसतो. त्याच्या परिणामांचा कोणताही विचार केलेला नाही. ओमिक्रॉनचे संकट नक्की आहे, त्याला रोखण्यासाठी आताच उपाययोजना करायला हव्यात, पण त्यासाठी केवळ निर्बंध हा एकमेव मार्ग नाही. राज्यात ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या १०८ वर पोहोचली आहे, पण यातून ५४ जण पूर्णपणे बरे झाले आहेत. पण ओमिक्रॉनच्या संसर्गाचा वेग जास्त असल्याने काळजी घ्यायला हवी. कोरोनाचा मुकाबला कसा करायचा याचा अनुभव आता आपल्याजवळ आहे. कोरोनाची प्रभावी लस उपलब्ध आहे.
परिणामकारक औषधे आणि पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे केवळ निर्बंधांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा मार्ग निवडावा लागेल. लक्षणे दिसताच रुग्णचाचणी, संपर्काचा शोध घेणे, उपचार करणे, लसीकरण आणि जबाबदारीचे भान ठेवून मास्क लावण्यापासूनचे योग्य वर्तन ही पंचसूत्री पाळावी लागणार आहे.
नागरिकांनी स्वतःहून बंधने पाळली तर अनेक गोष्टी सोप्या होतील. कोरोना, ओमिक्रॉन किंवा आणखी कोणता विषाणू किंवा साथरोग येईल याची आता खात्री नाही. त्यामुळे आपली जीवनशैलीच या वातावरणाला अनुकूल करावी लागेल. मास्क घालणे, लक्षणं आढळताच उपचार घेणे, कोणत्याही ठिकाणी गर्दी टाळणे, सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छतेचे नियम पाळणे यासाठी निर्बंधांची वाट का पाहायला जाते? आता कोणतेही निर्बंध आपल्याला परवडणार नाहीत. गेल्या दोन वर्षात निर्बंधांमुळे उद्योग, हॉटेल, खासगी व्यवसाय अशा सर्वच क्षेत्राला मोठी झळ बसली आहे. त्यातून बाहेर पडणे अजूनही शक्य झाले नाही. सरकारी मदतीच्या घोषणा झाल्या, पण या तुटपुंज्या मदतीतून काहीच होणार नाही, हे आपल्याला समजले आहे. अशावेळी स्वतःचा जीव सुरक्षित ठेवून सर्व व्यवहार करणे अंगवळणी पाडावे लागेल. त्यासाठीचे समाजभान तयार करावे लागेल. सरकारनेही निर्बंधांऐवजी प्रतिबंधात्मक उपायांवरच भर द्यावा, तरच या संकटाचा सामना करणे शक्य होईल.
हे नक्की करा
सरसकट निर्बंध लावण्यापेक्षा पर्यायी मार्ग निवडावे
भीतीचे वातावरण तयार करून व्यवहार थांबवू नयेत.
नागरिकांनी स्वतःहून गर्दीची ठिकाणे टाळावीत
बूस्टर डोस घेण्यास परवानगी द्यावी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.