संध्याकाळच्या आकाशात सहा ग्रह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संध्याकाळच्या आकाशात सहा ग्रह
संध्याकाळच्या आकाशात सहा ग्रह

संध्याकाळच्या आकाशात सहा ग्रह

sakal_logo
By

जानेवारी महिन्यात सूर्यास्तानंतर पश्चिम क्षितीजावर बुध, शुक्र, शनी व गुरू हे चार ग्रह एका ओळीत दिसतील. हे चार ग्रह नुसत्या डोळ्याने दिसू शकतील. या चार ग्रहात सर्वांत वरचा ग्रह असेल गुरू व त्यानंतर शनी, बुध व शुक्र दिसेल. शुक्र झपाट्याने सूर्याकडे सरकत असल्याने पहिल्या आठवड्यानंतर दिसू शकणार नाही. बुध सूर्यापासून दूर होत क्षितीजावर उंच चढताना दिसेल. यावेळी तो शनी जवळ १२-१४ जानेवारी रोजी पोहोचेल. दक्षिण आकाशात बॉयनॉक्युलरमधून दिसू शकणारे युरेनस व नेपच्यून ग्रह दिसतील. हे सर्व ग्रह पूर्वरात्री मावळल्यानंतर रात्री आकाशात एकही ग्रह नसेल. पहाटे नारिंगी रंगाचा मंगळ धनू राशीत उगवताना दिसेल. तो खूपच दूर असल्याने फार छोटा व मंदप्रभ दिसेल.

ग्रह :
* बुध : पश्चिम क्षितीजावर संध्याकाळी बुध दिसत आहे. तो सूर्यापासून दूर होत असल्याने क्षितीजावर उंच चढताना दिसेल. जानेवारी ७ तारखेला बुध सूर्यापासून दूरात दूर अशा १९ अंशावर पोहोचेल. या दिवशी बुध उणे ०.५ तेजस्वितेने चमकताना दिसेल. तो सूर्यास्तानंतर जवळ जवळ दीड तास दिसत राहील. बुध क्षितीजावर उंच चढत असताना त्याची शनी बरोबर गाठ पडेल. जानेवारी १२ ते १४ दरम्यान पिवळसर रंगाच्या शनी ग्रहाच्या जवळ व खालच्या बाजूस बुध दिसेल. यानंतर बुध सूर्याकडे सरकत असून तो संधी प्रकाशातच मावळू लागेल. बुधाची सूर्याबरोबर युती २३ तारखेला होईल.

* शुक्र : संध्याकाळी पश्चिम क्षितीजालगत शुक्र दिसेल. तो झपाट्याने सूर्याकडे सरकत असल्याने दिसेनासा होईल. त्याची सूर्याबरोबर युती ९ जानेवारी रोजी होईल. युतीनंतर अवघ्या आठवड्याभरात तो सूर्योदयापूर्वी पूर्व क्षितीजावर दिसू लागेल. तो वेगाने सूर्यापासून दूर होत असून महिनाअखेरीस सूर्योदयापूर्वी जवळ जवळ दोन तास उगवेल, यावेळी त्याची तेजस्विता उणे ४.५ व त्याचे ५० विकलांचे बिंब १५ टक्के प्रकाशित दिसेल. चंद्र व मंगळाजवळ शुक्र ३० तारखेला पाहता येईल.

* मंगळ : पहाटे पूर्व क्षितीजावर तांबूस रंगाचा मंगळ दिसेल. महिन्याच्या प्रारंभी तो पाचच्या सुमारास भुजंगधारी तारकासमूहात असताना उगवताना दिसेल. तो २० तारखेला धनू राशीत प्रवेश करीत असून २६ तारखेला एम. ८ नेब्युला जवळून प्रवास करताना दिसेल. चंद्राजवळ मंगळ २९-३० तारखेला दिसेल. यावेळी या दोघांच्या सोबतीत शुक्रदेखील तेथे येत असल्याने चंद्र, मंगळ व शुक्राचा छानसा त्रिकोण दिसू लागेल.

* गुरू : सूर्यास्तानंतर पश्चिम क्षितीजावर तेजस्वी गुरू दिसेल. महिन्याच्या प्रारंभी रात्री पावणेदहा वाजता मावळणारा गुरू महिनाअखेरीस सव्वा आठच्या सुमारास मावळेल. आता तो सूर्याकडे सरकत असल्याने जानेवारी व फेब्रुवारीच्या काही दिवसापर्यंतच दिसू शकेल. जानेवारी महिन्यात तो कुंभ राशीत दिसेल. महिन्याच्या प्रारंभी गुरूचे ३५ विकलांचे बिंब उणे २.१ तेजस्वितेचे दिसेल. लहान दुर्बिणीतून देखील गुरूच्या भोवतालचे चार चंद्र दिसतील. या चंद्राची ग्रहणे, पिधाने पाहण्याची संधी या महिन्यात मिळेल. चंद्राजवळ गुरू ६ जानेवारी रोजी दिसेल.

* शनी : पश्चिम क्षितीजावरच्या तेजस्वी गुरूच्या खालच्या बाजूस व बुधाच्या वर पिवळसर रंगाचा शनी दिसेल. महिन्याच्या प्रारंभी रात्री साडेआठ वाजता मावळणारा शनी सूर्याकडे सरकत असल्याने महिना अखेरीस पावणेसात वाजता मावळताना दिसेल. येत्या महिन्यात तो सूर्याजवळ पोहोचत असल्याने याच महिन्यात काही दिवस त्याला ठळकपणे पाहता येईल. शनी मकरेत असून त्याचे १५ विकलांचे बिंब ०.७ तेजस्वितेचे दिसेल. चंद्राजवळ शनी ४ जानेवारी रोजी दिसेल.

* युरेनस-नेपच्यून : दक्षिण आकाशात मेष राशीत युरेनस दिसेल. मेषेच्या हमल ताऱ्‍याजवळ व म्युसेती ताऱ्‍याच्या परिसरात हिरवट रंगाचा युरेनस दिसेल. त्याची तेजस्विता ५.८ आहे. दक्षिण पश्चिम
आकाशात कुंभ राशीत नेपच्यून दिसेल. कुंभेच्या फाय ताऱ्‍याजवळ नेपच्यून असून त्याची तेजस्विता ७.८ आहे.

* उल्कावर्षाव : ‘काड्रान्टिड्स’ नावाचा उल्कावर्षाव ३ जानेवारी रोजी पहाटे दिसतो. या उल्का भूतप, सप्तर्षी व ड्रॅको तारकासमूहाच्या मधल्या भागातून फेकल्या गेल्याचे दिसते. अंधाऱ्या ठिकाणाहून ताशी ४० उल्का दिसतील.

* चंद्र-सूर्य : मार्गशीर्ष अमावस्या २ जानेवारी रोजी मध्यरात्री किंवा ३ जानेवारी रोजी ०.०३ वाजता होईल. पौष पौर्णिमा १७ जानेवारी रोजी होईल. चंद्र पृथ्वीजवळ (३,५८,०३३ कि.मी.) २ जानेवारी रोजी तर पृथ्वीपासून दूर (४,०५,८०५ कि.मी.) १४ जानेवारी रोजी असेल. पृथ्वी अपसूर्य (पेरीहेलियन) स्थितीत ४ जानेवारी रोजी असेल. या दिवशी पृथ्वी तिच्या सूर्याभोवतालच्या कक्षेतील सूर्याजवळच्या स्थानावर असते.