अभियांत्रिकीच्या ५१ हजार जागा रिक्त

अभियांत्रिकीच्या ५१ हजार जागा रिक्त

पुणे, ता. १ : राज्यात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेतंर्गत ५१ हजार ५६ जागा अद्याप रिक्त आहेत. पसंतीचे महाविद्यालय आणि विद्याशाखा मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या शेवटच्या टप्प्यातील फेऱ्यांना पसंती दिल्याचे दिसून आले आहे. या प्रवेश प्रक्रियेतंर्गत आतापर्यंत ८९ हजार २४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहे.
राज्यातील ३२९ अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान (बी.ई/ बी.टेक) अभ्यासक्रम राबविणाऱ्या संस्थांमध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतंर्गत (कॅप) यंदा एक लाख ३० हजार ५४३ जागा उपलब्ध होत्या. या प्रवेश प्रक्रियेतील नियमित दुसरी फेरी नुकतीच संपली आहे. त्यानंतर संस्था स्तरावरील प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात आली. प्रवेशाची प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर पहिल्या फेरीत एक लाख ३७१ विद्यार्थ्यांनी, तर दुसऱ्या फेरीत ४४हजार ७७५ विद्यार्थ्यांनी ‘ऑप्शन फॉर्म’ भरला. दुसऱ्या फेरीनंतर आणि संस्था स्तरीय फेरी अशा आतापर्यंतच्या प्रवेश प्रक्रियेत जवळपास ८९ हजार २४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित घेतले आहेत. गेल्या वर्षीच्या अभियांत्रिकी प्रवेशाच्या कॅप फेरीशी तुलना करता यंदा प्रवेशासाठी उपलब्ध असणाऱ्या जागांची संख्या ही तुलनेने अधिक आहे. मागील वर्षीच्या म्हणजेच शैक्षणिक वर्ष २०२०-२१च्या तुलनेत यंदा प्रवेशाच्या जागांमध्ये सात ते आठ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येते.
प्रवेशासाठी उपलब्ध असणाऱ्या एकूण जागांपैकी सध्या जवळपास ३९ टक्के जागा रिक्त आहेत.

पुणे विभागामध्ये सर्वाधिक प्रवेश
अभियांत्रिकी प्रवेशाच्या रिक्त राहणाऱ्या जागांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असून गेल्यावर्षी जवळपास ५० टक्क्यांहून अधिक जागा रिक्त राहिल्या होत्या. अभियांत्रिकी प्रवेशामध्ये सर्वाधिक प्रवेश हे पुणे विभागात झाले आहेत. पुण्यात आतापर्यंत २५ हजारांहून अधिक प्रवेश झाले आहेत, अशी माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने दिली आहे.


उपलब्ध असलेल्या जागा
- प्रवेशासाठी (कॅप) उपलब्ध जागा : १,३०,५४३
- अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शिक्षण देणाऱ्या संस्था :३२९
- संस्थास्तरीय प्रवेशाच्या जागा : ८,६४८
- पहिल्या फेरीसाठी पात्र ठरलेले विद्यार्थी : १,०६,६२९
- दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरलेले विद्यार्थी : ८२,२३७
- आतापर्यंत झालेले एकूण प्रवेश : ८९,०२४
- एकूण रिक्त जागा : ५१,०५६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com