आरोग्यभान जपण्याचा करूया संकल्प!

आरोग्यभान जपण्याचा करूया संकल्प!

संभाजी पाटील : @psambhajisakal
नव वर्षात नव्या उमेदीने, जिद्दीने आणि जुन्या कटू अनुभवांवर मात करीत नवे संकल्प केले जातात. २०२१ हे वर्ष कोरोनाच्या भयंकर आणि दीर्घकालीन परिणामांमुळे सदैव स्मरणात राहील. परंतु, खरे आव्हान तर आता २०२२ मध्ये असणार आहे. एका बाजूला पुन्हा एकदा कोरोनाचा राक्षस आ वासून उभा राहिला आहे, तर दुसरीकडे येणाऱ्या निर्बंधांच्या भीतीने अर्थचक्राची गाळण उडाली आहे. या परिस्थितीत प्रत्येकाने स्वतःचे आरोग्य जपत कोणत्याही आव्हानाला तोंड देणारे आरोग्यभान तयार करावे लागेल. कारण न थांबता पुढे जाण्याची जीवनपद्धती अवलंबल्याशिवाय आता पर्याय नाही.

आटोक्यात आलेली रुग्णसंख्या, लसीकरण, उपचारांची नवी पद्धत यामुळे कोरोनाचे संकट नव्या वर्षात राहणार नाही, असे वाटत होते. परंतु, गेल्या तीन चार दिवसांत रुग्णांची संख्या ज्या पद्धतीने वाढत आहे, तो वेग पाहता मार्च २०२१ ची गंभीर परिस्थिती आठवते. पुण्यात पाच दिवसांपूर्वी रुग्णांची संख्या शंभरच्या आत होती, ती आता ४०० च्या पटीत गेली आहे. हे आकडे चिंता वाढविणारे आणि वेळीच सावध करणारे आहेत. सध्या सर्वांनी योग्य काळजी घेतली, तर कोरोना किंवा ओमिक्रॉनचा प्रसार रोखणे शक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पण ‘मी दोन्ही डोस घेतलेत’ किंवा ‘मी एकट्याने मास्क घातला नाही, तर काहीही फरक पडणार नाही’ हा फाजील आत्मविश्वास बाळगला, तर तिसरी लाट येण्यास वेळ लागणार नाही.

गेल्या वर्षी मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यांत दुसऱ्या लाटेने हाहाकार माजविला होता. रुग्णाला बेड मिळवणे, बेड मिळाला तर ऑक्सिजन मिळेल याची खात्री नव्हती. रेमडिसिव्हर इंजेक्शन मिळवण्यासाठी काय आटापिटा करावा लागला याची कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. या परिस्थितीत अनेकांना प्राण गमवावे लागले. एकट्या पुण्यातील हा आकडा नऊ हजारांपेक्षा जास्त आहे. या सर्व कटू आठवणी काढण्याचे कारण म्हणजे आपण पुन्हा एकदा त्याच संकटाच्या तोंडावर उभे आहोत. त्याचा सामना करायचा की, पुन्हा प्राणहानी आणि निर्बंधांचे जालीम उपाय सहन करायचे हे आपल्या हातात आहे.

जपानमध्ये दरवर्षी भूकंप होतात. या आपत्तीवर मात करण्यासाठी तेथील सरकारने स्वतःची पद्धती विकसित केली आहे. कोरोनाची आजची स्थिती पाहता हाच दृष्टिकोन ठेवून आपल्याला पुढे जावे लागेल. यापुढच्या काळात कोरोना, ओमिक्रॉन किंवा आणखी नवीन विषाणू किंवा साथरोग येईल. त्यावर निर्बंध लावणे हा उपाय राहणार नाही. दुसऱ्या लाटेतील निर्बंधांमुळे अनेक उद्योग, व्यवसाय देशोधडीला लागले. लाखो लोक बेकार झाले, त्यातून आजही आपण सावरलेले नसताना पुन्हा एकदा निर्बंध
लावण्यात आले. हे निर्बंध आणखी वाढविण्याची वक्तव्य सरकारच्याकडून केली जात आहेत. पण निर्बंध लादण्यापेक्षा कोरोनापासून बचावाची स्वयंशिस्त नागरिक म्हणून आपण पाळली, तर भविष्यातील संकटाची तीव्रता नक्कीच कमी करता येईल.

स्वतः हून मास्कचा काटेकोरपणे वापर केला, हात धुणे, अंतर ठेवणे, प्राथमिक लक्षणे आढळताच तपासणी करणे आणि उपचार घेणे, ट्रेसिंग, बाहेरच्या प्रवाशांवर बारीक लक्ष ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक गर्दी टाळणे, या गोष्टी आता जीवनपद्धतीचा भाग बनवायला हव्यात. त्यासाठी निर्बंध लावण्याची गरज भासता कामा नये. तसे झाले, तर सर्व व्यवहार सुरळीत राहतील. निर्बंधांमुळे व्यवसायांवर जे परिणाम होतात तेही रोखता येतील. पण एका बाजूला आम्ही कसलीच स्वयंशिस्त पाळणार नाही आणि दुसरीकडे निर्बंध लावले की तक्रार करणार, सरकारच्या मदतीची अपेक्षा करणार हे योग्य नाही. सार्वजनिक आरोग्य राखण्याचे भान, त्याचे शिक्षण आता आपल्याला घ्यावेच लागेल. सरकारी यंत्रणांनी गेल्यावर्षीच्या चुका टाळत वेळीच सज्ज राहायला हवे. नव्या वर्षात कोरोनासह, कोरोनावर मात करीत जगायचेय हाच संकल्प सर्वात महत्त्वाचा ठरेल.

हे नक्की करा
- निर्बंधाची वाट न पाहता स्वयंशिस्तीवर भर
- गर्दी टाळून व्यवहार सुरू राहतील असे प्रयत्न
- व्यवसाय, उद्योग बंद होणार नाहीत यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न.

दृष्टीक्षेपात कोरोना (पुण्यातील रुग्ण संख्या)
२ जानेवारी २०२१ : २३७
१ जानेवारी २०२२ : ३९९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com