मध्यस्थीच्या समुपदेशनामुळे मिटताय कौटुंबिक वाद | Family Court | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Family Court
समुपदेशनामुळे मिटताहेत कौटुंबिक वाद मध्यस्थांना तडजोड करण्यात यश; गेल्या वर्षात ५६ टक्के प्रकरणे निकाली

मध्यस्थीच्या समुपदेशनामुळे मिटताय कौटुंबिक वाद

पुणे : घरात झालेले भांडण मिटविण्यात कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, काही वाद घरात न मिटल्याने याबाबतची प्रकरणे कौटुंबिक न्यायालयात (Family Court) येते. यातून कुटुंबात आणखी दुरावा येऊ नये म्हणून दोन्ही बाजूंचे मध्‍यस्थीच्या माध्यमातून समुपदेशन करण्यात येते. यामुळे कौटुंबिक वाद मिटण्यास मोठी मदत होत असल्याचे न्यायालयातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

गेल्या वर्षात कौटुंबिक वादातून दाखल झालेले ५६ टक्के दावे मध्यस्थांद्वारे तडजोड करीत निकाली काढण्यात न्यायालयाला यश मिळाले आहे. गेल्या तीन वर्षांत हे प्रमाण सर्वाधिक आहे. वर्षभरात झालेल्या तिन्ही लोकअदालतींमध्ये ३६९ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली होती. त्यापैकी १०६ प्रकरणे निकाली निघाली असून ८२ जोडप्यांनी पुन्हा नांदण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कौटुंबिक न्यायालयाकडून देण्यात आली आहे. कौटुंबिक न्यायालयात न्यायाधीश, निवृत्त न्यायाधीश, विवाह समुपदेशक आणि मराठवाडा मित्र मंडळचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयातील विद्यार्थी, असे एकूण ३२ मध्यस्थ कार्यरत आहेत.

कोरोना काळात मर्यादित कालावधीत न्यायालयाचे कामकाज सुरू असतानाही मध्यस्थांद्वारे या प्रकरणांतील तडजोडीचे प्रमाण ५७ टक्के होते. २०२० मध्ये न्यायालयाचे कामकाज बंद ठेवण्यात आल्याने हे प्रमाण ३४.५६ टक्के होते. प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे आणि मध्यस्थी केंद्राचे समन्वयक म्हणून न्यायाधीश हितेश गणात्रा यांनी काम पाहिले.

दोघांमध्ये संवादाचे दालन खुले
बहुतांश जोडप्यांमधील वादामागे विसंवाद आणि त्यातून झालेले गैरसमज हे कारण असते. भविष्यात दोघांना एकत्र येण्याची शक्यता वाटत नसल्याने त्यांच्याकडून घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला जातो. दोघांमध्ये संवादाचे दालन खुले करण्याबरोबरच मध्यम मार्ग काढण्याची महत्त्वाची भूमिका मध्यस्थीद्वारे पार पाडली
जाते. त्यांच्यामध्ये समेट घडवून आणण्यात मध्यस्थी यशस्वी होत आहेत.

कोरोना काळात न्यायालये पूर्ण वेळ सुरू नव्हती. तरीही उपलब्ध वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे हाताळून मध्यस्थी व लोकन्यायालयाच्या माध्यमातून तडजोड घडवून आणण्याचा प्रयत्न करून त्यांचा निपटारा केला.
-सुभाष काफरे, प्रमुख न्यायाधीश, कौटुंबिक न्यायालय


मध्यस्थीमार्फत निकाली काढलेले प्रकरणे
वर्ष - दाखल प्रकरणे - निकाली निघालेली प्रकरणे - टक्केवारी
२०१९ - २३९ - १०५ - ४३.९३
२०२० - १०१ - ३५ - ३४.६५
२०२१ - ३६४ - २०६ - ५६.५९

- लोकअदालतीत ८२ जोडप्यांच्या रेशीम गाठी पुन्हा जुळल्या
- ऑगस्ट, सप्टेंबर आणि डिसेंबरमध्ये पार पडली लोकअदालत
- कौटुंबिक न्यायालयात एकूण ३२ मध्यस्थ
- मर्यादित कालावधीतच कामकाज सुरू असूनही मध्यस्थद्वारे सर्वाधिक तडजोडीचे प्रमाण

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top