महाड शहरातील रस्त्यांनी टाकली कात
नगर परिषदेकडून एका कोटी रुपयांचा निधी खर्च
महाड, ता. २० (बातमीदार) : महाड नगर परिषदेकडून शहरातील रस्त्यांच्या नूतनीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. महाड शहरातील रस्ते आता चकाचक झाले आहेत. या सर्व कामांसाठी सुमारे एक कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. यामुळे नागरिक व वाहन चालकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
कोरोना प्रदुर्भावाच्या काळामध्ये निधीच्या कमतरतेमुळे, तसेच त्यानंतर महाड शहराला महापुराचा तडाखा सहन करावा लागला. त्यामुळे शहरातील रस्त्यांची दुरुस्ती व नव्या रस्त्यांची कामे प्रलंबित राहिली होती. परंतु आता शहरातील रस्त्यांनी कात टाकली आहे. नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांच्या नगराध्यक्षपदाची मुदत डिसेंबर महिन्यामध्ये संपली. परंतु त्यानी आपल्या कारकीर्दीत शहरातील हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावला आहे.
शहरातील काकर तळे उभा मारुती ते पंचायत समितीपर्यंतचा रस्ता अरुंद व खराब झालेला होता. या ठिकाणी इमारतींची बांधकामे नव्याने होऊ लागल्याने या भागाला देखील महत्त्व येऊ लागले आहे. यामुळे नगरपालिकेने या रस्त्याच्या दुतर्फा सांडपाणी निचर्यासाठी गटारांची कामे केली आहेत. तर हा रस्ता नव्याने रुंदीकरण करून डांबरीकरण देखील केला आहे. महामार्गावरून महाड शहराला जोडणारा शेडाव नाका ते नवेनगर या रस्त्याचे देखील डांबरीकरण नव्याने करण्यात आले आहे. महाड नगरपालिकेकडून रस्ता कामांना गती मिळाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
कोट
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या भोवताली चांगल्या दर्जाचे डांबरीकरण करण्यात आले आहे. तर छत्रपती शिवाजी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक चवदार तळे पर्यंतचा रस्ता देखील डांबरीकरण करण्यात आला आहे. याशिवाय शहरातील इतर ठिकाणचे रस्त्यांवर पडलेले खड्डे हॉट मिक्सिंग पद्धतीने भरले जात आहे.
- सुहास कांबळे,
नगर अभियंता
महाड : शहरातील छत्रपती शिवाजी चौकाचे डांबरीकरण करण्यात आले.