विद्यापीठ चौकातील कोंडीवर नियंत्रण पण,... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठ चौकातील कोंडीवर नियंत्रण पण,...
विद्यापीठ चौकातील कोंडीवर नियंत्रण पण,...

विद्यापीठ चौकातील कोंडीवर नियंत्रण पण,...

sakal_logo
By

पुणे, ता. ३ ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकामध्ये केलेल्या वाहतूक बदलामुळे कोंडीवर नियंत्रण आले. मात्र, भरधाव वाहनांमुळे अभिमानश्री सोसायटीतील रहिवाशांना त्यांची वाहने बंगल्याबाहेर काढणे मुश्कील होऊ लागले आहे. त्याचबरोबर विद्यापीठ चौक व पाषाणहून येणारी वाहने अभिमानश्री सोसायटीत रस्ता ओलांडताना अपघात होण्याची दाट शक्‍यता आहे, तर ई-स्क्वेअर ते खैरेवाडीपर्यंतची कोंडी कायम आहे.

विद्यापीठासमोरील चौकात बांधण्यात येणाऱ्या दुमजली उड्डाणपुलाच्या कामामुळे परिसरातील वाहतूक २३ डिसेंबरपासून प्रायोगिक तत्त्वावर वर्तुळाकार पद्धतीने वळवली आहे. विद्यापीठासमोरील चौक, बाणेर रस्ता, पाषाण रस्ता, गणेशखिंड रस्ता व इतर प्रभावित रस्त्यावरील वाहतुकीमध्ये बदल केला. परंतु, विद्यापीठ चौकाकडून व पाषाणहून येणारी वाहने अभिमानश्री सोसायटीतून भरधाव जातात, त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्यांची वाहने बंगल्याबाहेर काढणे अडचणीचे ठरत आहे. तसेच, अपघातही होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. याबरोबरच अभिमानश्री सोसायटीतील बॅंक ऑफ इंडिया येथे बाहेर वाहने पार्किंग केल्याने कोंडीमध्ये भर पडत आहे.

दरम्यान, विद्यापीठ चौकातून बाणेर-बालेवाडीकडे जाणारी वाहने अभिमानश्री सोसायटीतून बाणेर, बालेवाडीकडे जाणारी वाहने आणि पाषाणहून विद्यापीठ चौकाकडे जाणारी वाहने अभिमानश्री सोसायटीतून रस्ता ओलांडताना एकमेकांसमोर येण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे यापूर्वी दोन अपघात झाले होते. भरधाव वाहने एकमेकांसमोर येऊन प्राणांतिक अपघाताच्या घटना घडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे विद्यापीठ चौकाकडून येणाऱ्या वाहनांनी वोक्‍सवॅगन शोरुमच्या समोरून जाण्याऐवजी पाषाणकडे जाणाऱ्या रस्त्याने उजव्याबाजूने वळून अभिमानश्री सोसायटीकडे आल्यास अपघात टळू शकतील, त्यादृष्टीने उपाययोजना करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.

खैरेवाडीपर्यंत वाहतूक कोंडी...
विद्यापीठासमोरील चौकातील कोंडी फोडण्यासाठी पोलिसांच्या प्रयत्नांना हळूहळू यश येत आहे. परंतु, ई-स्क्वेअरसमोर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे पाषाण, बाणेर-बालेवाडी व औंध या तिन्ही रस्त्यांवरून शिवाजीनगरच्या दिशेने जाणारी वाहने पुन्हा एकदा कॉसमॉस बॅंकेपासून ते खैरेवाडीपर्यंतच्या कोंडीत अडकत आहेत. त्यामुळे विद्यापीठ चौकातून सुटले, तरीही वाहनचालक पुढच्या कोंडीच्या जाळ्यात अडकत असल्याची सद्यःस्थिती आहे.

‘‘औंध, बाणेर, बालेवाडीकडे जाणारी वाहतूक सुरळीत झाली. अभिमानश्री सोसायटीमध्ये वाहने एकमेकांसमोर येऊन अपघाताची शक्‍यता आहे. तसेच, ई-स्क्वेअर ते खैरेवाडीपर्यंत कोंडी होत असल्यामुळे वाहनचालकांना त्रास सुरू आहे.’’
- वैशाली पाटकर, अध्यक्ष, औंध विकास मंडळ

‘‘तीव्र उतार असल्यामुळे अभिमानश्री सोसायटीतून येताना वाहने गतीने येत होती. तसेच, वाहने एका लेनमधून दुसऱ्या लेनमध्ये जाताना अपघात होण्याची शक्‍यता होती. त्यासाठी रम्बलर्स तयार केल्याने वाहनांची गती कमी झाली आहे. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार आवश्‍यक उपाययोजना केल्या आहेत.’’
- पुरुषोत्तम देवकर, सहायक पोलिस निरीक्षक, चतुःशृंगी वाहतूक विभाग

PNE22S32690

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top