तरुणीची दामिनी महिला पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण
पुणे, ता. ३ ः शेजाऱ्यांसमवेत झालेल्या भांडणाची पोलिस चौकीत तक्रार दाखल केल्यानंतरही तरुणी व तिच्या आईने दुसऱ्या चौकीत जाऊन बीट मार्शल महिला पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण केली. याप्रकरणी तरुणीविरुद्ध वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शेजाऱ्यांसमवेत झालेल्या भांडणाची तक्रार घेण्याऐवजी पोलिसांनी वाईट वागणूक दिल्यामुळे हा प्रकार घडला, वरिष्ठांनी संबंधित चौकशी करून पोलिसांवरही कारवाई करावी, अशी मागणी तरुणीच्या कुटुंबीयांनी केली.
मृणाल किरण पाटील (वय २२, रा. कर्वेनगर, गुरुप्रसाद कॉलनी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी महिला पोलिस कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून तिच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तसेच, मृणाल व तिची आई संजना किरण पाटील (वय ४०) यांच्याविरुद्ध सुनीता दळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघींविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल झाला. फिर्यादी पोलिस कर्मचारी या दामिनी बीट मार्शल म्हणून वारजे पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. रविवारी दुपारी दोन वाजता शेजाऱ्यांसमवेत झालेल्या भांडणाची तक्रार नोंदविण्यासाठी तरुणी तिची आई व भाऊ असे तिघेजण कर्वेनगर पोलिस चौकीमध्ये आले होते. मात्र, कर्वेनगर ऐवजी वारजे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. त्यानंतर तरुणीने कर्वेनगर पोलिस चौकीमध्ये येऊन आरडाओरडा केला. फिर्यादी महिला पोलिस कर्मचारी तिला शांत करण्याचा प्रयत्न करीत असतानाच तरुणीने फिर्यादीला अपशब्द वापरून मारहाण केली.
पोलिसांकडून वाईट वागणूक...
तरुणी व तिच्या शेजारी राहणाऱ्या दळवी कुटुंबाकडे श्वान आहे. शेजाऱ्यांचे श्वान तरुणीच्या घरासमोर घाण करीत होते. त्यावरून त्यांच्यात भांडणे झाली होती. त्याबाबत तक्रार देण्यासाठी तरुणी रविवारी दुपारी कर्वेनगर पोलिस चौकीत गेली होती. तेव्हा, पोलिसांनी तिची तक्रार घेण्याऐवजी तिला वाईट वागणूक दिली. त्यामुळे ती वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गेली. तेथे तक्रार नोंदविल्यानंतर ती कर्वेनगर पोलिस चौकीत आली. तेव्हा संबंधित पोलिसांनी मृणाल, तिची आई व भावाला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी मुलगी पोलिसांना मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ चित्रित करून तो प्रसारित केल्याचा आरोप तिचे वडील किरण पाटील यांनी केला आहे. मृणाल उच्चशिक्षीत असून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करीत आहे, असे असताना तिने पोलिसांवर हात उचलावा, अशी वेळ का आली, याची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशी मागणी पाटील यांनी केली.
‘‘पाटील व दळवी कुटुंबाकडे श्वान आहेत. दळवीच्या श्वानाने पाटील यांच्या घरासमोर घाण केल्याने त्यांच्यात भांडणे झाली. त्याविषयी दळवी कुटुंब तक्रार देण्यासाठी कर्वेनगर पोलिस चौकीत आले. तेव्हा तरुणीही तेथे आली. त्यांची तक्रार नोंदविल्यानंतर तिची तक्रार घेऊ असे सांगण्यात आले. मात्र, तिने पोलिस ठाणे गाठले, तेथे तिची तक्रार नोंदविली. त्यानंतर तिने पोलिस चौकीत जाऊन पोलिसांसमवेत वाद घातला.’’
- अमृत मराठे, पोलिस निरीक्षक, वारजे माळवाडी ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.