गीतायोग २५ जानेवारी २०२२
गीतायोग २५ जानेवारी २०२२
दैनिक सकाळ
श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे
आत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला ४१० ४०५
शासन करणाऱ्यांमधील यम
अध्याय १० श्र्लोक २९ इ
अनन्तश्र्चास्मि नागानां वरुणो यादसामहम् ।
पितृणामर्यमा चास्मि यमः संयमतामहम् ॥२९॥
मी नागांमध्ये शेषनाग, जलचरात त्यांचा अधिपती वरुण, पितरांमध्ये अर्यमा नावाचा पित्रेश्र्वर, शासन करणाऱ्यांमध्ये यम आहे.
यमः संयमतां अहम् – पंच, कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, राष्ट्रपती वगैरे न्यायासाठी धाव घेतली जाते, व तेथे सांगितलेला निर्णय मानला जातो. सगळ्यांना शासन करणारा आहे यमधर्म. यमापुढे कोणाचीही सत्ता नाही. त्याच्यापासून आजपर्यंत कोणीही सुटलेला नाही. कुठल्याही देवतेची काहीही कृपा झाली तरी यमाच्या तडाख्यातून कोणाही सुटत नाही, प्रत्येकाला मृत्यू येतोच. हा यम अनुशासनाचा देव. अनुशासनात राहणाऱ्यावर यम प्रसन्न असतो. चांगल्या-वाईटाचा हिशोब करून फळ द्यायचे काम यमाचे. शास्त्राला असंमत वर्तन केले की शिक्षा द्यायची व्यवस्था करण्याचे काम यमदेवतेचे.
यम हा विवस्वान व शरण्यू यांचा मुलगा. याला सोमपान आवडते. द्युलोकाचा (स्वर्ग) एक चतुर्थांश भाग यमाच्या अधिकाराखाली असतो, तेथे सगळे पितर असतात. उरलेले तीन भाग सूर्याच्या आधिपत्याखाली असतात. अग्नी हा आपल्या शरीरात यमाचा प्रतिनिधी आहे. आग्नेयदिशे अग्नये नमः व दक्षिणदिशे यमाय नमः असे आपण म्हणतो. अग्नी हा यमाचा उजवा हात आहे. सरतेशेवटी अग्नीच प्रत्येकाला यमाकडे नेतो. घुबड व कपोत हे यमाचे दूत आहेत. यमाच्या बाजूला असलेले दोन कुत्रे हे त्याचे रक्षक आहेत. या प्रत्येक कुत्र्याला चार डोळे असतात त्यामुळे त्यांना चारी बाजूचे दिसते. त्यामुळे यमाचे सगळीकडे लक्ष असते.
योगशास्त्रात यम-नियम सांगितलेले आहेत. योगशास्त्रात सांगितलेला यम या यमाशी जुळता आहे. सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह हे पाच यम होत. योगशास्त्रातील या यमांकडे पाहिले तर आपल्या लक्षात येते की यांची पूर्ण सिद्धी झाल्याशिवाय यमाच्या तडाख्यातून सुटका होणे शक्य नाही. सत्याची कास धरलेली असेल तोपर्यंत काही काळजी नसते, मात्र असत्याचा आधार घेतला की यमाचा तडाखा बसलाच असे समजावे. योगशास्त्रातील यम-नियम हे यमाला प्रसन्न करण्यासाठीच आहेत असे म्हणायला हरकत नाही.
आसन, प्राणायाम सुरू करण्याआधी या यम-नियमांची माहिती असणे अत्यंत आवश्यक असते. कितीही प्राणायाम केला पण वागणे अनैसर्गिक असेल तर उपयोग शून्य. एखाद्या योग्याने चोरी करायची ठरविली की त्याचाही श्र्वास वर-खाली होतोच, छाती धडधडायला लागतेच. नैसर्गिक असलेले, धर्माला अनुकूल असलेले कार्य केले तरच योगाचा फायदा होतो.
योगशास्त्रातील पाच नियम आहेत शौच, संतोष, तप, स्वाध्याय व ईश्र्वरप्रणिधान.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.