महिलांच्या नावे घरांची मालकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांच्या नावे घरांची मालकी
महिलांच्या नावे घरांची मालकी

महिलांच्या नावे घरांची मालकी

sakal_logo
By

पुणे, ता. २४ : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांना घरांची मालकी मिळावी, यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने खास फेरफार मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत प्रत्येक गावातील सर्व घरांवर पती-पत्नीची संयुक्त मालकी लावली जात आहे. यामुळे कुटुंबातील मालमत्तेत (प्रॉपर्टी) महिलांना समान वाटा मिळण्यास मदत होणार आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांमध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने समान वाटा देण्यात आला आहे. यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती, नगरपालिका, नगरपंचायती, महापालिका आदी संस्थांमधील एकूण लोकप्रतिनिधींपैकी ५० टक्के जागा या महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, शिक्षण, आरोग्य, प्रशासकीय सेवा, पोलिस आदी सर्वच प्रमुख क्षेत्रांसह विविध क्षेत्रांत महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू लागल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागात अद्यापही कुटुंबप्रमुख या नात्याने पुरुषांचेच वर्चस्व कायम आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील घरांच्या मालकीत महिलांचाही समान वाटा असावा, या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेने जिल्ह्यात खास महा फेरफार अभियान सुरू केले असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सोमवारी (ता. २४) सांगितले.

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्यावतीने १ डिसेंबर २०२१ पासून हे महा फेरफार अभियान सुरू केले आहे. या मोहिमेत सर्व गावे आणि वाड्या-वस्त्यांच्या गावठाणात असलेल्या सर्व मिळकतींच्या सातबारा आणि ‘आठ अ’च्या उताऱ्यावर कुटुंबप्रमुख म्हणून पती व पत्नींचे संयुक्त नाव लावण्यात येत आहे. यामुळे महिलांना पुरुषांच्या बरोबरीने मालमत्तेत मालकी हक्क मिळणार आहे.

महा फेरफार मोहिमेची प्रमुख वैशिष्ट्ये

मयत कुटुंबप्रमुखाची नावे कमी करणे
मयताच्या जागी वारसदारांची नोंद करणे
आठ अ उताऱ्यावर कुटुंबप्रमुख म्हणून पती व पत्नीचे संयुक्त नाव लावणे
गावठाणाबाहेर झालेल्या नवीन इमारती किंवा घरांच्या नोंदी करणे
गावठाणातील खरेदी-विक्री झालेल्या मालमत्तेच्या नोंदी अद्ययावत करणे

जिल्ह्यातील मालमत्तांबाबत संयुक्त माहिती

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची संख्या --- १ हजार ३८६
जिल्ह्यातील एकूण गावे --- १ हजार ८७४
एकूण वाड्या-वस्त्या --- ९ हजार ४६५
ग्रामीण भागातील एकूण कुटुंबे --- ९ लाख ९६ हजार २१२
गावे, वाड्या-वस्त्यांमधील एकूण मिळकती --- ९ लाख २८ हजार ३८९
आतापर्यंत महिलांच्या मालकी हक्काची नोंद झालेल्या मिळकती --- ५ लाख २४ हजार ५५९
महिलांचा मालकी हक्काच्या शिल्लक नोंदी --- ४ लाख ३ हजार ८३०
महिलांचा मालकी हक्क लागलेल्या नोंदीची टक्केवारी --- ५६.५० टक्के

गावातील मालमत्तांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिलांचाही समान वाटा असला पाहिजे, या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेने ही मोहीम सुरू केली आहे. याचा फायदा हा आपापल्या कुटुंबातील मालमत्तांमध्ये महिलांची मालकी लागण्यास होत आहे. शिवाय फेरफार नोंदी अद्ययावत होण्यास मदत होणार आहे. या मोहिमेमुळे मयत व्यक्तींच्या नोंदी कमी करणे, नवीन बांधकामांच्या नोंदी करणे आणि महिलांना मालमत्तेत कायदेशीर हिस्सा मिळविणे, आदींसाठी होणार आहे.
- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top