तडीपार आरोपींचा वावर खुलेआम

तडीपार आरोपींचा वावर खुलेआम

पिंपरी, ता. २३ : तडीपार आरोपी हद्दीत येऊ नये, याकरिता त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ‘एक्स ट्रॅकर’ ॲप तयार केले आहे. याद्वारे आरोपीचे लोकेशन व सेल्फी दररोज मागवून घेतला जात असल्याचे पोलिसांकडून सांगितले जाते. मात्र, हा उपक्रम केवळ नावापुरताच असल्याचे काही घटना व कारवायांवरून दिसून येते. सध्या अनेक तडीपार आरोपींचा आयुक्तालयाच्या हद्दीत खुलेआम वावर सुरू आहे.

गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना तडीपार केले जात आहे. पोलिसांनी तडीपार केल्यानंतर त्याला निश्चित करून दिलेल्या भौगोलिक हद्दीच्या बाहेर त्याने वास्तव्य करणे बंधनकारक असते. ज्या हद्दीत त्याला सोडले तेथूनही तो हद्दीत येतो. त्याच्याकडून पुन्हा गुन्हा घडण्याची शक्यता असते. त्यामुळे तडीपार आरोपींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी ‘एक्स ट्रॅकर’ ॲप तयार केले. या ॲपवरून मोबाईलद्वारे आरोपीने दररोज पोलिसांच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे. त्याच्या भौगोलिक स्थानाबाबत चौकशी करणे गरजेचे आहे. मोबाईल एका ठिकाणी ठेवून दुसरीकडे जाऊ नये, यासाठी आरोपीने स्वतःचा सेल्फीही पाठविणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित पोलिसांवर जबाबदारी दिली आहे. मात्र, तडीपार आरोपी पोलिसांना खोटी वेगवेगळी कारणे देतात. मोबाईल बंद पडला, नेटवर्क नाही, कॅमेरा बिघडला अशी करणे देत पोलिसांना गुंगारा देत असल्याचे दिसून येते. त्यानंतर हे आरोपी हद्दीत येऊन हत्यारे बाळगण्यासह गुन्हेगारी कारवाया करीत असल्याचेही दिसून येते.

मागील महिन्यात पिंपळे गुरव येथील खून प्रकरणात तडीपार आरोपीचा समावेश असल्याचे समोर आले. यासह इतरही तडीपार आरोपी हद्दीत येतात. आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच धक्काबुक्की, जिवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यावरून शहरात वावरत असल्याचे दिसून येते. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत २१९ जणांना तडीपार केले आहे. यामध्ये निगडी ठाण्याच्या हद्दीतील सर्वाधिक ४६, चाकण २७, वाकड व भोसरी ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी २३ गुन्हेगारांचा समावेश आहे.

महिनाभरात घडलेल्या घटना
- पिंपळे गुरव येथील योगेश जगताप खून प्रकरणातील आरोपी गणेश मोटे हा तडीपार असताना शहरात आला. १८ डिसेंबरला जगताप
याचा भरदिवसा खून करून पसार झाला.
- पिंपरीतील भाजी मंडई येथे ८ जानेवारीला सचिन शिवाजी सुर्वे (वय ३७, रा. भीमनगर, पिंपरी) याने पोलिसाशी झटापट करून जीवे मारण्याची धमकी दिली. सुर्वे याला २१ सप्टेंबर २०२० रोजी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे.
- पिंपरीगाव येथे शनिवारी (ता. २२) अतुल अविनाश पवार (वय ३३, रा. मिलिंदनगर पिंपरी) या तडीपार आरोपीने पोलिसाला धक्काबुक्की केली. पवार याला १९ सप्टेंबर २०२१ रोजी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे.

तडीपार आरोपी...
पिंपरी १८
चिंचवड ७
निगडी ४६
भोसरी २३
एमआयडीसी भोसरी १७
दिघी २
आळंदी १०
चाकण २७
वाकड २३
हिंजवडी ८
सांगवी ७
देहूरोड १८
तळेगाव ११
चिखली २
तळेगाव एमआयडीसी ००
एकूण २१९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com