भक्कम पुरावे नसतानाही हल्लेखोराला सात वर्षे सक्तमजुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भक्कम पुरावे नसतानाही हल्लेखोराला सात वर्षे सक्तमजुरी
भक्कम पुरावे नसतानाही हल्लेखोराला सात वर्षे सक्तमजुरी

भक्कम पुरावे नसतानाही हल्लेखोराला सात वर्षे सक्तमजुरी

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : किरकोळ कारणावरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणातील गुन्हा सिद्ध करण्यासाठी भक्कम पुरावे नसताना जखमी व्यक्तीची साक्ष आणि सरकारी वकिलांनी केलेल्या युक्तिवादाच्या आधारावर न्यायालयाने हल्लेखोराला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश ए. एन. शिरसीकर यांनी हा आदेश दिला.
सुभाष पांडुरंग कड (वय ३३, रा. दरेकरवाडी, ता. शिरूर, सध्या रा. खेड) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. १२ मे २०१२ रोजी शिरूर तालुक्यातील दरेकरवाडी येथे हा प्रकार घडला होता. कड याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात शंकर दत्तात्रेय दरेकर जखमी झाले होते. याप्रकरणी सागर शिवाजी दरेकर (वय २०, रा. दरेकरवाडी, शिरूर) यांने फिर्याद दिली होती. दरेकर यांनी कड यास आपली बहिण कोठे असल्याची विचारणा केली होती. यावरून कडने चाकूने व त्याच्या साथीदाराने काठ्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणात तिघांची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
या खटल्याचे कामकाज सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी पाहिले. पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने तपास झाल्याचे नमूद करीत ॲड. कावेडिया यांनी न्यायालयास अर्ज देऊन जखमी व्यक्तीला न्यायालयात बोलावून घेतले. त्याची तपासणी केल्यानंतर न्यायालयात त्याची साक्ष नोंदविली. मात्र खटला सुरू होईपर्यंत दरेकर यांचा जबाब न्यायालयापुढे आला नव्हता. तसेच, गुन्ह्यात वापरलेले हत्यार व आरोपीने घटनेवेळी घातलेले कपडे जप्त केले नाही. पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने तपास होत असेल तर त्याचा फायदा आरोपींना होईल. या स्वरूपाच्या घटनांमुळे समाजात चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे न्यायालयाने उपलब्ध पुराव्यांआधारे आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद ॲड. कावेडिया यांनी केला.
जखमी व्यक्तीचा जबाब का नोंदविला नाही? यावर तपासी अधिकाऱ्यांना न्यायालयापुढे कोणतेही कारण सांगता आले नाही. तसेच हत्यार जप्त का केले नाही? याचेही कारण पोलिसांना सांगता आले नाही, अशी माहिती ॲड. कावेडिया यांनी दिली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top