धावपट्टी वाढीसाठी संरक्षणंत्र्यांना साकडे
पुणे, ता. ६ ः कार्गोसाठीची मोठी विमाने आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवरील विमानांच्या उड्डाणांसाठी लोहगाव विमानतळाची धावपट्टी वाढविण्यात यावी, या मागणीसाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे शिष्टमंडळ संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांना साकडे घालणार आहेत.
लोहगाव विमातळाच्या धावपट्टीची लांबी सध्या २५५३ मीटर आहे. कार्गोसाठीची मोठी विमाने आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवरील विमानासाठी ही धावपट्टी अपुरी असल्यामुळे ती विमाने यावर उतरू शकत नाही. त्यामुळे या धावपट्टीची लांबी किमान एक हजार मीटरने वाढविण्याची मागणी तज्ज्ञांकडून होत आहे. लोहगाव विमानतळ हवाई दलाचा आहे. त्यांच्याकडून आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) या बाबत एकमत होत नसल्यामुळे धावपट्टी विस्तारीकरणाचा प्रश्न गेल्या १८ वर्षांपासून प्रलंबित आहे. चेंबरने या बाबत केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हवाई दलाने परवानगी दिल्यास धावपट्टीची लांबी वाढविण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता संरक्षण मंत्र्यांशीच चर्चा करून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न असेल, असे चेंबरचे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी नमूद केले.
लोहगाव विमानतळावरील कार्गोची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. या विमानतळावरून जून २०१७ पासून कार्गोद्वारे वाहतूक सुरू आहे. त्याची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. परंतु, त्यासाठी भूखंडाची आवश्यकता आहे. तो मिळाल्यावर सहा महिन्यांत कार्गो टर्मिनलची इमारत उभारण्यात येईल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
शारजासाठी पुण्यातून थेट विमानसेवा
शारजासाठी पुण्यातून स्पाईसजेटद्वारे थेट विमानसेवा शुक्रवारपासून (ता. ७) सुरू होणार आहे. हे विमान रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी सुटेल. शारजावरून हे विमान पहाटे पाच वाजून ३० मिनिटांनी पुण्यासाठी निघेल. या प्रवासासाठी जाणाऱ्या प्रवाशांना ४८ तासांतील आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक असेल. तसेच केंद्र सरकारच्या सूचनांनुसार प्रवासापूर्वी ६ तासांतील रॅपिड पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल बरोबर बाळगणे आवश्यक आहे. रॅपिड पीसीआर चाचणीची व्यवस्था विमानतळावर करण्यात आली आहे. त्यासाठी १९७५ रुपये शुल्क आकारण्यात येईल. या चाचणीचा अहवाल प्रवाशांना ३० ते ४५ मिनिटांत उपलब्ध होईल, अशी माहिती विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.