विषघ्न धूप निर्जंतुकीकरणासाठी प्रभावी
पतंजलीच्या शास्त्रज्ञांचा शोधनिबंध प्रकाशित
पुणे, ता. ७ : यज्ञातील समिधा आणि त्यातून उत्सर्जित होणाऱ्या घटकांमुळे हवेचे शुद्धीकरण होते. यासंबंधीचा शोधनिबंध पतंजली संशोधन संस्थेच्या शास्रज्ञांनी जर्नल ऑफ एव्हिडन्स बेस्ड इन्टीग्रेटीव्ह मेडिसिन या शोधपत्रिकेत प्रकाशित केला आहे. जिवाणू, बुरशी आणि विषाणूंना रोखण्यासाठी यज्ञातील घटक प्रभावी ठरत असल्याचे संशोधनात म्हटले आहे.
विषघ्न धूप, नॅनो-स्केल कणांसह डिटॉक्सिफायिंग मेडिसिनल फ्यूम आदींचा हवेच्या निर्जंतुकीकरणावर होणारा परिणाम या संशोधनात अभ्यासण्यास आला आहे. आयुर्वेदातील पारंपरिक यज्ञ पद्धत वातावरण निर्जंतुकीकरणासाठी प्रभावी ठरत असल्याचे पतंजलीने म्हटले आहे. आचार्य बालकृष्ण म्हणाले, ‘‘प्राचीन यज्ञ परंपरेला प्रथमच आधुनिक वैज्ञानिकाच्या कसोटीवर तपासण्यात आले आहे. मानसिक शांतीसाठी करण्यात येणारा यज्ञ हा खरं तर शारीरिक स्वास्थ्यासाठीही महत्त्वपूर्ण ठरत आहे.’’ यज्ञाच्या वेळी तयार होणाऱ्या विषघ्न धुपाची शास्रीय चाचणी करण्यात आली आहे. प्रमुख संशोधक डॉ. अनुराग वार्ष्णेय म्हणाले, ‘‘विषघ्न धुप या समिधेतून बाहेर पडणाऱ्या धुराचा हवेतील हानिकारक घटकांवर चाचणी करण्यात आली. दूषित वातावरणात असणाऱ्या रोगकारक जिवाणूंची वाढ या धुपामधून बाहेर पडणारा धूर रोखत असल्याचे अथवा नष्ट करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.’’
कोट
स्कॅनिंग इलेक्ट्रॉनिक सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यावर विषघ्न धूप नॅनो पार्टीकलने युक्त असल्याचे दिसत आहे. गॅस क्रोमॅटोग्राफी आणि इतर प्रयोगशाळेतील चाचण्यांमधून हे सर्व घटक जिवाणूरोधी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
- डॉ. अनुराग वार्ष्णेय, वरिष्ठ शास्त्रज्ञ, पतंजली संशोधन संस्था.