मेट्रोची ‘ताशी ९०’ वेगाने चाचणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेट्रोची ‘ताशी ९०’ वेगाने चाचणी
मेट्रोची ‘ताशी ९०’ वेगाने चाचणी

मेट्रोची ‘ताशी ९०’ वेगाने चाचणी

sakal_logo
By

पुणे, ता. ७ ः पुणे शहरातील वनाज-रामवाडी मार्गावरील मेट्रोची ताशी ९० किलोमीटर वेगाने चाचणी यशस्वीपणे पार पाडण्यात महामेट्रोला यश आले आहे. कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टीकडून आता परवानगी मिळाल्यावर प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. सुरवातीच्या पहिल्या टप्प्यात शहरातील मेट्रो ताशी ४० किलोमीटर वेगाने धावणार आहे.
वनाज- रामवाडी मार्गावरील मेट्रोचे पहिल्या टप्प्यातील म्हणजे वनाज-गरवारे महाविद्यालय मार्गाचे काम बहुतांश पूर्ण झाले आहे. या मार्गावरील वनाज, आनंदनगर, आयडियल कॉलनी, नळस्टॉप आणि गरवारे महाविद्यालय या स्थानकांचीही कामे पूर्णत्वास आली आहेत. वनाज-रामवाडी मार्गावर मेट्रोची या पूर्वी चाचणी वेळोवेळी झाली आहे. परंतु, आता मेट्रोने कमाल ९० किलोमीटर ताशी वेगाने चाचणी घेतली आहे. त्यासाठी पाहणी करण्यास रेल्वेच्या लखनौ येथील रिसर्च अँड डिझाईन ऑर्गनायझेशनचे पथकही पुण्यात आले आहे. ताशी ९० किलोमीटर वेगाची चाचणी सलग पाच-सहा दिवस घेण्यात येत आहे. आता हा मार्ग कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टीच्या तपासणीसाठी सज्ज झाला आहे. त्यांचे पथक १०-११ जानेवारीच्या सुमारास पाहणीसाठी पुण्यात येईल. त्यांच्याकडून एक दिवसांत तपासणी होईल, त्यानंतर उद्‍घाटन झाल्यावर मेट्रोची प्रवासी वाहतूक सुरू होईल, असे मेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांनी स्पष्ट केले.

ताशी ४० किलोमीटर वेगाने धावेल
ताशी ९० किलोमीटर वेगाने मेट्रोची धावण्याची क्षमता असली तरी, पहिल्या वर्षी मेट्रो शहरात ताशी ४० किलोमीटर वेगाने धावेल. आवश्यकतेनुसार हा वेग कमी-जास्त होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. पिंपरी-फुगेवाडी मार्गावरही पहिल्या टप्प्यात ताशी ४० किलोमीटर वेगाने धावणार आहे.

पंतप्रधान येणार उद्‍घाटनाला
पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो मार्गाचे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २३ डिसेंबर २०१६ रोजी झाले होते. पहिला टप्पा पूर्ण झाल्यामुळे त्यांच्याच हस्ते प्रत्यक्ष उद्‍घाटन व्हावे, असा आमचा प्रयत्न आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते १८ जानेवारीला उद्‍घाटन करण्याचा प्रयत्न होता. परंतु, कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे तेव्हा होऊ शकत नाही. त्यामुळे त्यानंतरच्या आठवड्यात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्‍घाटन व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top