हिरकणी, सिंधूताईंकडून प्रेरणा घेऊन मुलांना शिकविले

हिरकणी, सिंधूताईंकडून प्रेरणा घेऊन मुलांना शिकविले

पुणे, ता. ८ ः स्वतःला शिक्षणाची आवड होती. मात्र शिक्षण घेऊन काय होणार आहे. मुलीच्या जातीला कशाला हवे शिक्षण. लिहायला वाचायला आले, म्हणजे बास झाले. घरातील व्यक्तींच्या या शब्दांच्या माऱ्यामुळे बारावी नंतरचे शिक्षण नाइलाजास्तव सोडावे लागले. कालांतराने लग्न झाले. तेथून जीवनाचा प्रवास सुरू झाला. मुलंबाळं झाल्यानंतर त्यांना शिक्षण मिळालेच पाहिजे. या जिद्दीने पेटून हलाखीच्या परिस्थितीतून मार्ग काढत दोन्ही मुलांना मेकॅनिकल इंजिनिअर बनवले.

हिरकणीने स्वतःच्या बाळासाठी जसा गड सर केला. तसेच सिंधूताई सपकाळ यांनी ज्या प्रकारे संघर्ष केला. त्यांची प्रेरणा घेऊन संसाराची जबाबदारी सांभाळल्याचे यशोदा पवार सांगतात. मूळगाव सोलापूर, लग्नानंतर पुण्यातील लोहियानगरमध्ये स्थायिक व्हावे लागले. पती सुतारकाम करतात. घरात सासू आणि दोन मुले अशा कुटुंबात एकूण पाच व्यक्ती आहेत. संसाराचा गाडा चालवताना गरिबीची जाणीव झाली. पतीच्या अनियमित कामाच्या स्वरूपामुळे घर खर्च भागविणे कठीण होते. या परिस्थितीतून सावरण्यासाठी आणि मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी काम करणे हाच पर्याय समोर होता. शिक्षण अर्धवट असल्याने नोकरी मिळेल याची शक्यता नव्हती. त्यामुळे धुण्या-भांड्यांची कामे सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

जीवनात येणाऱ्या अडचणींना समर्थपणे तोंड देण्यासाठी शिक्षणच उपयोगी पडते. मुलीला शिकवले तर ती खूप काही करू शकते. मला पुढील शिक्षण घेता आले असते तर मीही खूप पुढे गेले असते. मात्र, या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी शिक्षणच उपयोगी पडते. आजही पुढील शिक्षण घेण्याची इच्छा आहे. सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार यांच्या मार्गदर्शनामुळे मुलांना योग्य शिक्षण देता आले. महापालिकेच्या योजनांमुळे आर्थिक मदत झाली, असे त्या म्हणाल्या.

आई-वडिलांनी केलेले संस्कार कधीच वाया जात नाहीत. त्यामुळे आपण कोणत्या भागात राहतो, याचा परिणाम जीवनावर कधीच होत नाही असा विश्वास आहे. झोपडपट्टी भागात राहूनही मुलांना चांगले शिक्षण देण्याचे ठरविले होते. खोली अतिशय लहान असली तरी मुलांना कधी अभ्यासासाठी व्यत्यय येऊ दिला नाही.
- यशोदा पवार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com