चिनी मांजाला आवरा; माणसांच्या जिवाला सावरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिनी मांजाला आवरा; माणसांच्या जिवाला सावरा
चिनी मांजाला आवरा; माणसांच्या जिवाला सावरा नागरिकांसह पक्षी जखमी होण्याच्या घटना; महापालिका, पोलिसांकडून कारवाई नाही

चिनी मांजाला आवरा; माणसांच्या जिवाला सावरा

sakal_logo
By

पुणे, ता. ९ ः मकरसंक्रांतीच्या निमित्ताने पतंग उडविण्याचा आनंद मुलांकडून घेतला जात आहे. परंतु, त्यासाठी घातक चिनी, नायलॉन व तंगुस प्रकारातील मांजाचा वापर केला जात आहे. मांजामुळे काही दिवसांपूर्वीच शहरातील दोन ते तीन नागरिक जखमी झाले, तर पक्षांचे जीव गेले. असे असतानाही मांजाची छुप्या पद्धतीने विक्री सुरू असून पुन्हा एकदा एखाद्या नागरिकाचा जीव गेल्यावरच पोलिस व महापालिका प्रशासन जागे होणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

शहरातील हौशी नागरिक, लहान मुले नदीपात्र, मोकळी मैदाने, इमारतींचे टेरेस, टेकड्यांवर जाऊन पतंग उडवितात. त्यासाठी साध्या दोऱ्याचा वापर करण्याऐवजी चिनी, नायलॉन मांजाचा वापर केला जात आहे. अनेकदा मुलांकडून एकमेकांचे पतंग कापण्यासाठी धोकादायक व बंदी असलेल्या चिनी, नायलॉन, तंगुस मांजाचा वापर केला जातो. परिणामी, तुटलेला मांजा नागरिकांच्या गळ्याला, मानेला अडकून गंभीर दुखापती होत असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. त्याचबरोबर पंख, पायांमध्ये मांजा अडकल्याने पक्षांचाही जीव जात असल्याच्या घटना घडत आहेत.


मांजा विक्री व वापरावर बंदी
मांजामुळे पक्षी, प्राणी व माणसांनाही आपल्या प्राणास मुकावे लागल्याने ‘पेटा’ या संस्थेने राष्ट्रीय हरित लवादाकडे (एनजीटी) दाखल केलेल्या याचिकेची दखल घेत मांजा विक्री व वापरावर बंदी घातली आहे. त्यानुसार, गुन्हे दाखल होऊन विक्रेत्यांना अटकही केली जाते. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात विक्रेत्यांकडून घातक मांजा छुप्या पद्धतीने विकला जातो.

गुन्हे दाखल
पुणे पोलिसांकडून फेब्रुवारी २०१८ पासून धोकादायक मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध कारवाई केली जाते. मागील वर्षीही पोलिसांनी शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजारपेठ, उपनगरे व झोपडपट्ट्यांमधील दुकानांमध्ये मांजा विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई केली होती. विशेषतः मांजा विक्री करणाऱ्यांची माहिती देणाऱ्यांसाठी रोख बक्षिस देण्याबरोबरच त्यांची नावे गुप्त ठेवून कारवाईवर भर दिला होता.


मांजामुळे घडलेल्या दुर्घटना
१) ७ फेब्रुवारी २०१८ ः ‘सकाळ’च्या कर्मचारी सुवर्णा मुजुमदार यांचा चिनी मांजाने गळा कापला गेला. त्यातच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
२) ७ ऑक्‍टोबर २०१८ ः पिंपरी-चिंचवडमधील नाशिक फाटा येथील जेआरडी उड्डाणपुलावरून दुचाकीवरून
जाणाऱ्या डॉ. कृपाली निकम यांच्या गळ्याभोवती मांजा गुंडाळल्याने व रुग्णालयात नेण्यास उशीर झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

चिनी, नायलॉन व तंगुस प्रकारातील धोकादायक मांजा विक्री करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. त्यादृष्टीने विक्रेते, दुकानदारांनीही धोकादायक मांजा विक्री टाळावी, अन्यथा त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल. याबाबत गुन्हे शाखेच्या पथकांना सूचना दिल्या आहेत.
- रामनाथ पोकळे,
अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे)

मागीलवर्षी मी दांडेकर पुलावरून दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी अचानक मांजा माझ्या गळ्याभोवती गुंडाळला गेला. मांजा गळा व डोळ्याला कापल्याने गंभीर दुखापत झाली होती. त्यावर अनेक दिवस उपचार घेतल्यानंतर जखम बरी झाली. मुलांनी, नागरीकांनी घातक मांजा वापरायचे टाळावे. त्यामुळे माणसांबरोबरच प्राण्यांचेही जीव जात आहेत.
- डॉ. सपना देव

मांजापासूनचे धोके
१) वाहनचालकांच्या गळ्याभोवती गुंडाळून जीवितास धोका
२) दरवर्षी एक हजारांहून अधिक पक्षी जखमी
३) २०० हून अधिक पक्ष्यांचा मृत्यू
४) जानेवारी-एप्रिल महिन्यांत घटनांमध्ये वाढ

तुम्हाला काय वाटते....
धोकादायक मांजामुळे नागरिकांसह प्राणी व पक्ष्यांचेही जीव जात आहेत. बंदी असतानाही त्याची सर्रासपणे विक्री होते. याबाबत तुमचे मत नावासह व्हॉट्सॲपवर पाठवा...
८४८४९७३६०२

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top