ऑफलाइन परीक्षा सर्व समावेशक असाव्यात

ऑफलाइन परीक्षा सर्व समावेशक असाव्यात

पुणे, ता. २७ ः ‘‘विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मूल्यमापनासाठी विद्यापीठाने ऑफलाइन परीक्षेला प्राधान्य द्यावे. हे करत असताना नवीन शैक्षणिक धोरणात अभिप्रेत निरनिराळ्या मूल्यमापन पद्धतीचा वापर करावा. जेणेकरून ऑफलाइन परीक्षा पद्धत सर्वसमावेशक होईल,’’ असे मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

राज्यातील विद्यापीठांना १५ फेब्रुवारीनंतर ऑफलाइन परीक्षा घेण्यास उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. मात्र, परीक्षा ऑफलाइन घ्यायची की ऑनलाइन हा निर्णय विद्यापीठ स्तरावर घ्यावा, असे आदेशात स्पष्ट म्हटले आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षे ऑनलाइन परीक्षेतील त्रुटी आणि मर्यादा लक्षात आल्या आहेत. मूल्यमापन पद्धतीबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. संजय चाकणे म्हणाले, ‘‘परीक्षा ऑफलाइनच घ्यायला हवी, या मताचा मी आहे. ऑनलाइन परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांचे परिपूर्ण मूल्यमापन होत नाही. नवीन शैक्षणिक धोरणात सुचविलेल्या विविध मूल्यमापन पद्धतींचा आपण अवलंब करू शकतो. शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ऑफलाइन मूल्यमापन पद्धतीचा अवलंब करायला हवा.’’ सरकारने जरी ऑफलाइन परीक्षेला परवानगी दिली असली, तरी काही विद्यापीठांची ऑनलाइन परीक्षेसाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे पुढील आठवडाभरातच विद्यापीठांच्या परीक्षापद्धतींबद्दल स्पष्टता येईल.

विद्यापीठाचे ऑनलाइन नियोजन..
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षांचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेतला आहे. त्याची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. या बद्दल विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे म्हणाले, ‘‘ऑनलाइन परीक्षा हा मूल्यमापनाचा परिपूर्ण पर्याय ठरू शकत नाही. मात्र, कोरोनाच्या परिस्थिती आणि तेव्हाचे शासन निर्णय पाहून विद्यापीठाने मागेच ऑनलाइन परीक्षांचा निर्णय घेतला आहे. आता त्या परीक्षांचे नियोजनही सुरू आहे. पुढील काही दिवसांतच परीक्षांच्या तारखा घोषित होतील. या संबंधीचा काही निर्णय घ्यायचा असेल, तर तो कुलगुरू आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळ घेईल.’’

‘‘परीक्षांसंदर्भात विद्यार्थ्यांची मानसिकता सध्या दोलायमान स्थितीत आहे. ऑनलाइन परीक्षांमुळे त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे ऑफलाइन परीक्षांना प्राधान्य द्यायला हवे. सातत्यपूर्ण मूल्यांकन आणि निरनिराळ्या पद्धतींचा वापर करत ऑफलाइन परीक्षा घ्यायला हव्यात. यासंबंधी विद्यापीठानेच कार्यपद्धती निश्चित करायला हवी.
- डॉ. पंडित विद्यासागर, माजी कुलगुरू, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

तज्ज्ञ म्हणतात..
- ऑनलाइन परीक्षेमुळे एकांगी मूल्यमापन, त्यामुळे तो परिपूर्ण पर्याय असूच शकत नाही
- शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाइनच असावी
- सातत्यपूर्ण मूल्यमापन पद्धतीचा अवलंब करावा
- मुलाखत, प्रात्यक्षिके, प्रकल्प, चर्चा आदी नवीन शैक्षणिक धोरणातील मूल्यमापन पद्धतीचा अवलंब करावा
- अंतर्गत मूल्यमापनावर अधिक भर हवा
- ऑनलाइन परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com