कोरोना रुग्णांना आता सात दिवसात घरी सोडणार
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना; सौम्य लक्षणे असल्यास गृहविलगीकरण

कोरोना रुग्णांना आता सात दिवसात घरी सोडणार केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना; सौम्य लक्षणे असल्यास गृहविलगीकरण

पुणे, ता. ११ : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्र सरकारने रुग्णांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना उपचारासाठी दाखल न करता गृहविलगीकरणात त्यांच्यावर उपचार करावे. परंतु, सौम्य लक्षणे आणि सहव्याधी असलेल्या रुग्णांना गरजेनुसार उपचारासाठी दाखल करावे. या रुग्णांना सलग तीन दिवस ताप आला नाही किंवा त्यांची ऑक्सिजन पातळी ९३ टक्क्यांहून अधिक असल्यास त्यांना सात दिवसांत घरी सोडावे, आदी सूचनांचा यात समावेश आहे.

कोरोना रुग्णांचे उपचार, गृहविलगीकरण आणि गृहविलगीकरणात रुग्णांनी काय काळजी घ्यावी, याबाबत सुधारित धोरण केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी निश्‍चित केले आहे. त्यानुसार सौम्य लक्षणे असलेला सर्वसाधारण रुग्ण, सौम्य लक्षणे असलेला व अन्य व्याधीने ग्रस्त असलेला रुग्ण, मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेले आणि गंभीर लक्षणे अहनचसलेले रुग्ण, अशा चार संवर्गात रुग्णांचे वर्गीकरण केले आहे.

कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर घरच्या घरीच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार केले जाणार आहेत. सौम्य लक्षणे व सहव्याधी असलेल्या रुग्णांना सरसकट रुग्णालयांत दाखल करू नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचाराची गरज असलेल्या रुग्णांना पहिल्यांदा कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करावे. या रुग्णांना सलग तीन दिवस ताप आला नाही किंवा या रुग्णांची ऑक्सिजन पातळी सलग तीन दिवस ९३ टक्क्यांहून अधिक असल्यास त्यांना सात दिवसांत घरी सोडावे. घरी सोडण्यापूर्वी त्यांची पुन्हा कोरोना चाचणी घेऊ नये, असे केंद्रीय आरोग्य खात्याने सूचीत केले आहे.

मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांनासुद्धा सरसकट दाखल न करता गरजेनुसार उपचारासाठी दाखल करावे. त्यांना थेट रुग्णालयात दाखल न करता प्रथम ‘डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर’मध्ये दाखल करावे. त्यांना सलग तीन दिवस ताप न आल्यास आणि ऑक्सिजनची पातळी ९३ टक्क्यांहून अधिक असल्यास त्यांना सात दिवसात घरी सोडण्यात येणार आहे. यापुढे केवळ गंभीर रुग्ण आणि सहव्याधी असलेले गंभीर रुग्णांनाच उपचारासाठी थेट रुग्णालयात दाखल करून घेतले जाणार आहे. अन्य सर्व रुग्णांना गृहविलगीकरणात, कोविड केअर सेंटर किंवा डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये उपचार घ्यावे लागणार असल्याचे या मार्गदर्शक सूचनांत नमूद केले आहे.

गृहविलगीकरणातील रुग्णांनी काय करावे?
-कुटुंबातील अन्य सर्व व्यक्तींपासून दूर राहावे
-घरात रुग्णासाठी स्वतंत्र खोली, शौचालय व स्नानगृह असावे
-घरात सातत्याने मास्कचा वापर करावा
-पुरेशी विश्रांती घेऊन मोठ्या प्रमाणात द्रव पदार्थांचे सेवन करावे
-सातत्याने हात स्वच्छ धुवावेत किंवा सॅनियायझरचा वापर करावा
-रुग्णाने स्वतःच्या वस्तू घरातील इतरांना वापरु देऊ नये
- शरीरातील ऑक्सिजनची पातळी व ताप दररोज मोजावा
-घरातील इतरांच्या समोरासमोर संपर्कात येऊ नये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com