‘सीओईपी’तील जम्बो रुग्णालयाला मुदतवाढ

वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर स्थायी समितीची मान्यता

‘सीओईपी’तील जम्बो रुग्णालयाला मुदतवाढ वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर स्थायी समितीची मान्यता

पुणे, ता. ११ ः कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्याने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) मैदानावरील महापालिकेचे जम्बो कोविड रुग्णालय सज्ज झाले असून, तेथील वैद्यकीय सेवा, औषधपुरवठा, स्वच्छता यासाठी काम करणाऱ्या संस्थांना आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज (ता. ११) स्थायी समितीत घेण्यात आला.

जम्बो रुग्णालयात एकूण ८०० बेड उपलब्ध आहेत. यामध्ये ६०० ऑक्सिजन बेड, १०० आयसीयू बेड आणि १०० एचडीयू बेडचा समावेश आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीसाठी या रुग्णालयाला मुदतवाढ देण्यात आली होती. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर या वर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समिती समोर ठेवला होता, त्यास मान्यता दिल्याचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मेडबोज हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेकडून खाटा आणि उपचाराचे व्यवस्थापन केले जाते. त्यांना एका ऑक्सिजन बेडसाठी १ हजार ४०४ रुपये, आयसीयू बेडसाठी ४ हजार ३८५ रुपये, एचडीयू बेडसाठी ३ हजार ८४३ रुपये आणि कोविड केअर सेंटरसाठी प्रत्येकी ९५० रुपये दिले जातात. दीपाली डिझाईन्स अँड एक्झिबीट्स कंपनीकडून मूलभूत सुविधा पुरविणे, स्वच्छता आणि सुरक्षा यंत्रणा घेतली आहे. त्यासाठी प्रति महिना १ कोटी ८८ लाख रुपये दिले जाणार आहेत.

जेएसके मेडिकल सिस्टिमकडून बायोमेडिकल उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीची कामे केली जातात. मेडब्रोज हेल्थकेअरने नियुक्त केलेली सीओर्इपी जम्बो कोविड सेंटर इमर्जन्सी सर्व्हिसेस कंपनी औषधाचा पुरवठा करीत आहे. जेनेरिक औषधांच्या छापील किमतीवर ७७ टक्के आणि बँडेड औषधांच्या छापील किमतीवर ३६ टक्के सवलत दिली जाते. कोविड १९ अंतर्गत जम्बो रुग्णालयासाठी करण्यात आलेल्या पंचाहत्तर कोटी रुपयांच्या तरतुदीतून हा खर्च केला जाणार असल्याचे रासने यांनी या वेळी सांगितले.

सध्या १०० बेड तयार
शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जम्बो रुग्णालय सज्ज केले आहे. यामध्ये ८०० पैकी १०० बेड तयार ठेवले आहेत. त्यामध्ये ८० बेड ऑक्सिजनचे तर २० आयसीयू बेड आहेत. तर, महापालिकेच्या इतर रुग्णालयांमध्ये बेड रिकामे असल्याने ‘जम्बो’मध्ये अद्याप प्रवेश देणे सुरू केले नसल्याचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com