‘भिक्षेकऱ्यांचा डॉक्टर’ पुस्तकाचे प्रकाशन

‘भिक्षेकऱ्यांचा डॉक्टर’ पुस्तकाचे प्रकाशन

‘भिक्षेकऱ्यांचा डॉक्टर’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे, ता. १३ : डॉ. अभिजित सोनवणे आणि डॉ. मनीषा सोनवणे लिखित ‘भिक्षेकऱ्यांचा डॉक्टर’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. गेल्या सात वर्षांपासून सोनवणे दांपत्य भीक मागणाऱ्या लोकांना वैद्यकीय सेवा देत त्यांचे पुनर्वसन करत आहेत. या कामात आलेले अनुभव पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी शब्दबद्ध केले आहेत. डॉ. अभिजित सोनवणे यांनी बालपणापासून ते डॉक्टर होईपर्यंतचा आपला प्रवासही या पुस्तकात मांडला आहे. विशेष म्हणजे भिक्षेकऱ्यांच्याच हस्ते पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
-----------------------
औंधगावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह
पुणे, ता. १३ : औंधगाव येथील पेशवेकालीन विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे मृदुंग, विणेकरी व टाळांच्या गजरात ‘अखंड हरिनाम सप्ताह तपपूर्ती सोहळा’ नुकताच संपन्न झाला. या सोहळ्यात ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण, महिला भजनी मंडळाची भजन सेवा, नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. तर सप्ताहाच्या समाप्तीच्या दिवशी पालखीत ज्ञानेश्वरी पारायण गाथा व विठ्ठल रुक्मिणी पादुका स्थापित करून नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. या सप्ताहासाठी रयत शिक्षण संस्था, औंधगाव भजनी मंडळ, जय भवानी मित्र मंडळ, विठ्ठल रुक्मिणी महिला मंडळ वा छत्रपती प्रतिष्ठान यांनी संयोजक म्हणून काम पाहिले.
------------------------
कुंका रोबोटिक्स कंपनीची
कपिकुल मॅकेट्रॉनिक्स पार्टनर
पुणे, ता. १३ : ‘कपिकुल मॅकेट्रॉनिक्स प्रा. लि.’ या रोबोटिक्स आणि ऑटोमेशन कंपनीला प्रख्यात जर्मन कंपनी ‘कुंका रोबोटिक्स’ या कंपनीकडून त्यांचे भारतातील अधिकृत सिस्टीम पार्टनर म्हणून नुकतेच घोषित करण्यात आले. या संबंधीचे प्रमाणपत्र ‘कपिकुल मॅकेट्रॉनिक्स’च्या संचालक मैत्रेयी अंबाडे व संचालक पराग साळवेकर यांनी स्वीकारले. ‘कपिकुल मॅकेट्रॉनिक्स’ ही कंपनी गेली अनेक वर्षे रोबोटिक्स आणि ऑटोमेशन क्षेत्रात सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. तसेच अत्याधुनिक रोबोटचे ज्ञान भारतीय विद्यार्थ्यांना कमीत कमी खर्चात शिकवून त्याचा आपल्या देशासाठी उपयोग कसा करावा, याचेही प्रशिक्षण देऊन कंपनी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे, असे मैत्रेयी अंबाडे यांनी सांगितले.
-------------------------
संकल्प संस्थेतर्फे रक्तदान शिबिर
संकल्प सामाजिक सेवा संस्थेतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हांडेवाडीमधील अट्रीया ग्रँडे सोसायटीमध्ये रक्तदान शिबिर नुकतेच आयोजित केले होते. या शिबिरात ७३ सोसायटी सभासदांनी रक्तदान केले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उमेश कोंढाळकर तसेच गणेश घुले, बाळामामा भानगिरे, गणेश शेलार, बाळासाहेब चव्हाण, प्रसाद आठवले, रोहित कांबळे, सागर गोरे, संतोष पोळ, मुकेश चौधरी आदी उपस्थित होते. शिबिराला सोसायटीचे शशांक श्रीगार यांचे सहकार्य लाभले.
--------------------------
‘श्रीरंग कलादर्पण’ची सिंधूताई सपकाळ यांना श्रद्धांजली
पुणे, ता. १३ : अनाथांची माय सिंधूताई सपकाळ यांना ‘श्रीरंग कलादर्पण’ संस्थेतर्फे रांगोळीच्या माध्यमातून नुकतीच श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ‘माईंचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे असून ते आमच्या सारख्या संस्थांना मार्गदर्शन करत राहील’, अशी भावना श्रीरंग कलादर्पणचे संस्थापक अक्षय शहापूरकर यांनी व्यक्त केली. यावेळी संस्थेचे संचालक प्रतीक अथणे तसेच अजित पवार आणि त्यांचे विद्यार्थी उपस्थित होते.
--------------------------
अपयशाला न घाबरता प्रयत्न करत रहा : जागीरदार
पुणे, ता. १३ : अपयश आपल्याला उत्तम धडा शिकवते. म्हणूनच अपयशाला न घाबरता सातत्याने प्रयत्न करत रहा, असे मत आर्सेलर मित्तल निपॉन स्टील लि.चे मुख्य मनुष्यबळ व्यवस्थापक मुकुंद जागीरदार यांनी व्यक्त केले. यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या एमबीए व एमसीए विद्यार्थ्यांच्या स्वागत सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्याच्या पुढील सत्रांमध्ये कॉर्पोरेट ट्रेनर आणि समुपदेशक डॉ. पराग ठुसे, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे वरिष्ठ सल्लागार अमित पाटील व पर्सिस्टंट सिस्टिम्स लि. चे सोल्यूशन आर्किटेक्ट अमोल कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी
केले. सूत्रसंचालन डॉ. सचिन मिसाळ व प्रा. प्रशांत वाडकर यांनी केले. तर डॉ. वंदना मोहंती यांनी आभार मानले.
--------------------------
मॉडेल कॉलोनीत मोफत औषधोपचार केंद्र सुरू
पुणे, ता. १३ : शहर काँग्रेस कमिटीतर्फे राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त मॉडेल कॉलोनी येथे गरजू महिलांकारिता मोफत दवाखाना व औषधोपचार केंद्राचे उद्‌घाटन काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी आणि शहर महिला काँग्रेसच्या नवनिर्वाचीत अध्यक्ष व नगरसेविका पूजा आनंद यांच्या हस्ते नुकतेच झाले. या कार्यक्रमासाठी नगरसेवक दत्ता बहिरट, काँग्रेस महिला संघटक ॲड. राजश्री अडसूळ तसेच संगीता रुपटक्के, नीता शिंदे, पौर्णिमा भगत, सोशल मीडियाचे गुलाम हुसेन, भारत पवार, आशुतोष जाधव, संजय धोत्रे, बंडू चव्हाण, बाबा सय्यद, गणेश गुगळे, शिवा हुले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काँग्रेस लीगल सेलचे उपाध्यक्ष ॲड. फैयाज शेख यांनी केले. तर विक्रांत धोत्रे यांनी आभार मानले.
-------------------------
वडगाव शेरीत ब्राह्मण महासंघाच्या शाखेचे उद्‌घाटन
पुणे, ता. १३ : वडगाव शेरी येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या शाखेचे उद्‌घाटन परिसरातील श्री गजानन महाराज मंदिरात महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या सोहळ्यात ३२ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी नगरसेवक योगेश मुळीक, ज्ञानेश्वर शिंदे उपस्थित होते. जिल्हा कार्याध्यक्ष मंदार रेडे, जिल्हाध्यक्षा केतकी कुलकर्णी, सरचिटणीस विकास अभ्यंकर, पुरोहित आघाडी अध्यक्ष संतोष वैद्य, शाखेचे अध्यक्ष राजेश सहस्त्रबुद्धे, महिला आघाडीच्या शाखा अध्यक्ष रोहिणी ढोले तसेच अनिता काळे, अनघा सहस्त्रबुद्धे, विलास अवचट यांनी आयोजनात सहभाग घेतला. आगामी काळात अनेक ब्राह्मण कुटुंबे जोडून समाजपयोगी कार्यक्रम घ्यायचा निर्धार शाखेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com