पुणे विद्यापीठात आता योगाशास्त्रावर संशोधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yoga
पुणे विद्यापीठात आता योगाशास्त्रावर संशोधन

पुणे विद्यापीठात आता योगाशास्त्रावर संशोधन

पुणे : अभिजात योगसाधना समजून घेणे, तिचा सखोल अभ्यास करणे आणि त्यात संशोधन करणे याची संधी आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University)विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विद्यापीठाने या संदर्भात एक आश्वासक पाऊल उचलले असून त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महर्षी विनोद रिसर्च फाउंडेशन (Maharshi Vinod Research Foundation) (एम.व्ही.आर.एफ.) समवेत सामंजस्य करार करण्यात आला आहे.विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आणि महर्षी विनोद रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक-संचालक डॉ. संप्रसाद विनोद यांनी या करारावर पुणे विद्यापीठात स्वाक्षऱ्या केल्या. अभिजात योगसाधनेसंबंधी मूलभूत संशोधन करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना या कराराद्वारे नव्या संधी मिळणार आहेत.(Research on Yoga at Pune University)

हेही वाचा: चीनच्या नद्यांवरील डेटासाठी भारताने मोजले तब्बल 158 दशलक्ष रुपये

डॉ. करमळकर म्हणाले, ‘‘योग म्हणजे फक्त आसने किंवा सूर्यनमस्कार नव्हे, तर तो स्व-शोधाचा एक प्रवास आहे. योग अभ्यासातून ती दिशा विद्यार्थ्यांना मिळावी म्हणून हा सामंजस्य करार केला असून त्याचा त्यांना निश्चितपणे चांगला फायदा होईल.’’डॉ. संप्रसाद विनोद म्हणाले, ‘‘मानसशास्त्रीय अभ्यासामध्ये ज्या संकल्पना शिकवल्या जातात, त्यांच्या मुळाशी जाण्यासाठी योगाभ्यास निश्चितच उपयुक्त ठरतो. मनाचा तळ गाठण्यासाठी, खऱ्या मनःशांतीसाठी विद्यार्थ्यांना योगसाधना आणि योगाभ्यास नक्कीच उपयुक्त ठरेल. संशोधनाची व अभ्यासाची ही गरज लक्षात घेऊन विद्यापीठ आणि फाउंडेशनने घेतलेला पुढाकार निश्चितच सर्वांना उपयुक्त ठरेल.’’ या नव्या करारांतर्गत योगाभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना फाउंडेशनच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना या संशोधनातून एक नवी दृष्टी मिळणार असून विविध मानसशास्त्रीय संकल्पना स्पष्ट होण्याबरोबरच व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीनेही हा अभ्यास उपयुक्त ठरेल, असे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top