पंचनामा- सु. ल खुटवड माझ्या मना. . .बन दगड
गेल्या काही दिवसांपासून श्रीकांत अस्वस्थ होता. खाण्या-पिण्यात त्याचे मन अजिबात रमत नव्हते. सतत शून्यात बघत बसायचा. या साऱ्या प्रकारामुळे त्याची बायको स्वाती चिंतेत होती. ‘‘काय हो काय झालं?’’ या तिच्या प्रश्नावर ‘‘माझ्या मोबाईलवर कोणी तरी करणी केली आहे. मी कितीही भारी पोस्ट टाकली तरी चार-पाच लाईक व एक-दोन कमेंटच्या पुढं जात नाही. तो मनोज नाहीतर सुधीर बघ. काहीतरी फालतू दोन-तीन ओळी खरडतात आणि त्यांना शेकडो लाईक्स मिळतात. मीच असं काय पाप केलंय?’’ असं म्हणून तो परत शून्यात बघू लागला. त्याचं हे वागणं बघून स्वाती पुन्हा काळजीत पडली. तिने अनेक डॉक्टरांना दाखवलं; पण काही फरक पडला नाही. शेवटी कोणीतरी तिला सांगितले, की दगडधोंडे महाराजांकडे नेल्यास त्यांचा गुण येईल. मात्र, अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या अशा प्रकाराला श्रीकांतने खूप विरोध केला; पण बायकोच्या हट्टापुढे त्याचे काही चालले नाही. ती त्याला घेऊन सकाळीच महाराजांकडे आली. महाराजांनी तिची समस्या ऐकून घेतली व श्रीकांतच्या कपाळाला अंगारा लावत ते म्हणाले, ‘‘बालका, आपल्या आयुष्यात असं होतंच असतं. सगळ्या गोष्टी मनासारख्या घडत नसतात. तुझा जो प्रॉब्लेम आहे, तीन-चार वर्षापूर्वी तो माझाही होता. मला तर समाजमाध्यमांवर कोणी काळं कुत्रं विचारत नव्हतं. म्हणून मला संन्यास घ्यावा लागला.’’ असं म्हणून दगडधोंडे महाराजांनी जीभ चावली.
‘‘तुझी इच्छा असेल तर माझ्या पलीकडे पथारी टाकून बस.’’ महाराजांचे हे बोलणे ऐकून स्वाती घाबरली. ‘‘महाराज, यावर काहीतरी तोडगा काढा. माझ्या नवऱ्याला यातून वाचवा.’’
‘‘बालिके, मी तुझ्या नवऱ्याला बरा करतो; पण त्याआधी पाचशेची नोट समोरच्या पेटीत टाक,’’ महाराजांनी आदेश दिल्यावर स्वातीने पाचशे रुपये पेटीत टाकले. त्यावर महाराजांचा चेहरा उजळला. त्यांनी श्रीकांतला पुन्हा अंगारा लावला. ‘‘माझे नाव दगडधोंडे महाराज का आहे माहिती आहे का? मी रुग्णांवर दगड-धोंड्यांनी उपचार करतो म्हणून.’’ असे म्हणून त्यांनी एका भक्ताला गोल आकाराचा गुळगुळीत दगड आणायला सांगितला. त्यानंतर त्यांनी त्याच्यावर मंत्र टाकायला सुरवात केली. ‘‘मी या गुळगुळीत दगडावर मंत्र टाकला आहे. रोज तीनदा उजव्या पायावर तो मारुन घ्यायचा. असं सलग अकरा दिवस करायचं. त्यामुळे इकडं-तिकडं भटकणारं तुमचं मन स्थिर होईल व तुम्ही बाराव्या दिवशी खडखडीत बरे व्हाल,’’ असं म्हणून महाराजांनी तो दगड श्रीकांतच्या ताब्यात दिला व दगडाची किंमत पाचशे रुपये सांगितली. श्रीकांतने पाचशे रुपये पेटीत टाकले. त्यानंतर श्रीकांत महाराजांकडे आला व खाली वाकला. तो आपल्या पाया पडतोय, असे समजून महाराजांनी पाय पुढे केले. तेवढ्यात श्रीकांतने तीनवेळा सटासट त्यांच्या उजव्या पायावर जोरात दगड
आपटला. पाय हातात घेत महाराज जोरजोरात ओरडू लागले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत श्रीकांत निरागसपणे म्हणाला, ‘‘महाराज उद्या किती वाजता येऊ?". त्या दिवसांपासून दगडधोंडे महाराज फरार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.